गोष्ट भुताच्या प्रेमाची - ही एका भुताबरोबरच्या प्रेमाची आणि संसाराची गोष्ट

https://bookstruck.app/book/2966

श्रीकांत साठे भरतपूरच्या एस.टी. स्टॅण्डवर उतरला तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजत आले होते. त्याने अंगाला आळोखे पिळोखे देत आजूबाजूला नजर फिरवली. स्टॅन्ड काही फार मोठे नव्हते, पण छान टुमदार छोटीशी इमारत, आजूबाजूची स्वछता, पलीकडे झाडांची रांग मस्त वाटत होते. खास कोकणातील देखावा. बँक ऑफ बरोडाच्या भरतपूर शाखेत श्रीकांतची बदली झाली होती. बँकेतील अंतर्गत राजकारणाचा परिणाम म्हणून स्पष्टवक्ता, अन्यायाचा प्रतिकार करणारा खमका व्यक्ती म्हणून बँक कर्मचाऱ्यांचा कंपूत प्रसिद्ध असलेला श्रीकांत साठे ला वरिष्ठांनी दूर कोकणात भरतपूरच्या शाखेत पाठवले होते. श्रीकांतची घरची परिस्थिती तशी चांगली होती. ऍडिशनल कलेक्टर म्हणून रिटायर झालेल्या नीलकंठ साठेंचा श्रीकांत हा एकुलता एक मुलगा. बदली नाकारून राजीनामा दिला असता तरी काही बिघडलं नसतं. पण मध्यंतरी पल्लवी आणि त्याच्यातील ब्रेकअप मुळे श्रीकांत मनाने बराचसा डिस्टर्ब् झाला होता. अनेक वर्ष एकमेकांसोबत वेळ घातल्यानंतर पल्लवीने ऐनवेळी घरच्यांच्या पसंतीनुसार एका अमेरिकेत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनीअर बरोबर लग्न करून परदेशी जाण्याचा निर्णय श्रीकांतला मनाने उध्वस्त करून गेला होता. त्यामुळे काही वर्ष पुण्याबाहेर काढायला काही हरकत नाही असा विचार करून त्याने ही बदली स्वीकारत रत्नागिरी जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण असलेल्या भरतपूरला जायचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज तो भरतपूर मध्ये दाखल झाला होता. सकाळी पुणे ते रत्नागिरी हा आठ तासांचा प्रवास आणि त्यानंतर एक तासाचा भरतपूरचा प्रवास करून त्याचं अंग अगदी अवघडून गेलं होतं.

श्रीकांतने मोबाईल काढून अगोदरच बोलणे केलेल्या अल्ताफभाई या इस्टेट एजंटला फोन केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षा करून तो त्यांच्या ऑफिसवर पोहोचला. अल्ताफभाईंनी श्रीकांतचे अगदी मनापासून स्वागत केले. तसेही कोकणी माणूस हा अगत्यशील असतोच, आणि त्यात इस्टेट एजंट म्हणून काम करताने अगत्य महत्वाचे. अल्ताफ तर या कामात चांगलाच मुरलेला होता.

'या साठे साहेब, बसा, काय घेणार? चहा कॉफी कि काही थंड.?

‘चहा चालेल’ श्रीकांत म्हणाला.

अल्ताफभाईंनी शेजारच्या हॉटेलवाल्याला चहाची ऑर्डर दिली आणि पुन्हा येऊन बसत बोलणे सुरु केले.

त्यांनी श्रीकांतला राहण्यासाठी दोन तीन जागा सुचवल्या. श्रीकांतने अगोदरच सांगितल्याप्रमाणे एक गावाबाहेरचा निवांत बंगला पसंत केला. एकटा राहणार असला तरी श्रीकांतला एकटेपण नेहमीच आवडायचे.

‘साठे साहेब, त्यापेक्षा तुम्ही या शहरातल्या जागा बघा ना’ अल्ताफभाई म्हणाले.

'नको, मला जरा एकटे राहणेच आवडते. बंगल्याच्या मालकाचा काही प्रॉब्लेम नाही ना? श्रीकांतने विचारले.

‘मालकाचा प्रॉब्लेम नाही पण’… अल्ताफभाई जरा आढेवेढेच घेत बोलत होते.

‘साठे साहेब, जरा स्पष्टच बोलतो. त्या बंगल्यामध्ये चार-पाच वर्षांपूर्वी मालक आणि मालकिणीनेच आत्महत्या केली होती. तेंव्हापासून त्या बंगल्याबद्दल गावात फार चांगले बोलत नाहीत’

‘एवढंच ना, मग मला काही हरकत नाही. मी नाही भूतां-खेतांना घाबरत’ असे म्हणत श्रीकांत मोठयाने हसला.

‘ठीक आहे, तुम्ही म्हणताच आहात तर उद्या दाखवतो तुम्हाला बंगला’

‘उद्या कशाला? आत्ताच जाऊ या की’ श्रीकांत म्हणाला.

संध्याकाळ होत आल्याने खरेतर अल्ताफभाईंची यायची इच्छा नव्हती. पण श्रीकांतला नाहीही म्हणता येत नव्हते. श्रीकांत एका नामांकित बँकेचा मॅनेजर म्हणून इथे रुजू होत होता आणि अल्ताफभाईचे खातेही त्याच बँकेत होते.

'ठीक आहे,चला जाऊ या, म्हणत अल्ताफभाईने ऑफिसचे शटर ओढून घेतले आणि अल्ताफभाईंच्या मारुती-अल्टो मधून दोघे निघाले.

एसटी स्टँडला वळसा घालून एम.जी. रोडने दोघे जात होते. जाता जाता अल्ताफभाई श्रीकांतला आजूबाजूच्या परिसराची ओळख करून देत होते. काही वेळाने त्यांनी नरवीर तानाजी चौकातून उजवीकडचा रस्ता पकडला. पुढे पुढे वस्ती एकदम विरळ होत गेली. रस्ताही कधीकाळी केलेला खडीचा होता. काही वेळाने ते पुन्हा एकदा छोट्या कच्च्या रस्त्यावर वळले आणि समोर एक टुमदार बंगला दिसू लागला. ‘अनुग्रह’ असं बंगल्याचे नाव उठून दिसत होते. गेट जवळ अल्ताफभाईंनी गाडी थांबवली. श्रीकांत बंगल्याचे निरीक्षण करत होता. अल्ताफभाईंच्या म्हणण्यानुसार चार पाच वर्ष इथे कोणीही राहत नव्हते, तरी पण बंगला अगदी महिन्याभरापूर्वी रंगवल्यासारखा चकाकत होता. अल्ताफभाईंनी खिशातून तीन चाव्या असलेला जुडगा काढला आणि त्याची एक चावी शोधून गेट उघडले. गेट अगदी कालच तेलपाणी केल्यासारखे अलगद आवाज न करता उघडले. दोघांच्याही मनात वेगवेगळे विचार खेळत होते.

श्रीकांत ला बंगला अगदी मनापासून आवडला. अल्ताफभाईंनी दुसरी चावी शोधून दरवाजा उघडला आणि दोघांनीही आत प्रवेश केला. समोर बघून दोघेही आश्चर्यचकित झाले. समोरचा फर्निचरने सुसज्ज असलेला हॉल, पलीकडे किचन, एका बाजूला संडास बाथरूम, त्याला लागून एक छोटी स्टडीरूम, आणि एक मास्टर बेडरूम. सगळीकडे बघितल्यावर असे बिलकुल वाटत नव्हते कि इथे अनेक वर्ष कुणी राहत नाही.

‘वा! अल्ताफभाई, तुमची सर्व्हिस आवडली आपल्याला. सर्व फर्निचर सह बंगला भाड्याने द्यायचा.’ श्रीकांत म्हणाला. यावर अल्ताफभाई मात्र ओढग्रस्तीने खोटं खोटं हसले. त्यांना चांगले आठवत होते कि बंगला ताब्यात घेताने इथले सगळे जुने फर्निचर लिलावात विकलेले होते आणि तरीही हे सर्व आले कुठून?

‘साठे साहेब, मला वाटतं या बंगल्यात एकटे राहण्यापेक्षा तुम्ही गावातील जागा बघा’

'अहो काय हे अल्ताफभाई, एवढा सुसज्ज छान बंगला सोडून कशाला दुसरीकडे जायचे? श्रीकांत म्हणाला.

‘बघा साहेब, मी आपले तुम्हाला अजून एकदा आठवण करून देतो कि, या बंगल्याबद्दल चांगले बोलले जात नाही.’ अल्ताफभाईंनी पुन्हा एकदा त्याला आठवण करून दिली. खरेतर व्यवसाय म्हटल्यावर मिळतंय गिर्हाईक तर कशाला सोडा असा सोयीस्कर विचार अल्ताफने अगोदर केला होता. पण श्रीकांतच्या एकंदरीत पर्सनॅलिटीवरून त्याला त्रास होऊ नये असे अल्ताफला वाटत होते.

‘नका काळजी करू अल्ताफभाई, मला नाही फरक पडत’ श्रीकांत निग्रहाने म्हणाला.

‘बरं ठीक आहे, चला निघूया’… दरवाज्याकडे वळत अल्ताफभाई म्हणाले.

‘मी काय म्हणतोय, एवीतेवी सर्व सोयी आहेच तर आजपासूनच मी राहतो इथंच’ श्रीकांत म्हणाला.

‘बघा बुवा, हवे तर राहा, पण मला मात्र आता निघायला हवे’ घड्याळाकडे पाहत अल्ताफभाई म्हणाले. त्यांना तिथून कधी एकदा बाहेर पडतोय असे झाले होते.

'बरं इथे खाण्यापिण्याची जवळपास काय सोय होईल? श्रीकांतने विचारले.

'आता आपण मागच्या चौकात वळलो तिथे तुम्हाला सर्व काही मिळेल, हो पण तिथपर्यंत चालत जायला लागेल. इकडे रिक्षा वाले सहसा येत नाहीत आणि त्यांना गिर्हाइकंही मिळत नाही.

'मग मला चौकात सोडा, रात्री जाण्यापेक्षा आजच्या दिवस काहीतरी पार्सल इथेच घेऊन येतो. श्रीकांत म्हणाला.

पडत्या फळाची आज्ञा घेत अल्ताफभाईंनी दरवाज्याला कुलूप घातले आणि चाव्या श्रीकांत कडे दिल्या. पुन्हा गाडीवर बसून दोघेही नरवीर तानाजी चौकात आले. तिथे अल्ताफभाईंनी श्रीकांतला सोडले. समोरच असलेल्या हॉटेलकडे बोट दाखवत श्रीकांतला म्हणाले ‘समोरच्या हॉटेल मध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल.’ आणि पलीकडे हवे तर बार-रेस्टॉरंट पण आहे.’ असं सांगत अल्ताफभाईंनी श्रीकांतचा निरोप घेतला, पण तरी जाता जाता ‘काळजी घ्या, साठे साहेब’ असा इशाराही दिला.

श्रीकांतला त्या रस्त्याने एक फेरी मारावी असे वाटले होते, पण पहिलाच दिवस आहे, अंधार पडायच्या आत घरी पोहोचावे असा विचार करत त्याने समोर दिसणाऱ्या ‘कोकण-किनारा’ हॉटेल मध्ये प्रवेश केला. गल्ल्यावर एक पन्नास साठ वर्षाचे सात्विक दिसणारे गृहस्थ बसलेले होते. आत येणाऱ्या श्रीकांतला त्यांनी नमस्कार केला, आणि अगत्याने ‘या या साहेब’ म्हटले. त्यांच्या अगत्याचा हलकेच हसून स्वीकार करत आत जाण्याऐवजी श्रीकांत काउंटरलाच उभा राहिला आणि समोर ठेवलेल्या मेनूकार्डवर नजर टाकू लागला.

'काही पार्सल हवे आहे का? मालकांनी चोकशी केली. प्रवासात श्रीकांतचे दुपारचे जेवण फारसे झालेले नव्हते.

‘हो, एक पनीर कढई, तीन रोटी आणि जिरा-राईस, एक थम्सअप’ श्रीकांतने ऑर्डर दिली.

मालकाने वेटरला बोलावून पार्सल तयार करायला सांगितले.

'बसा साहेब, थोडा वेळ लागेल. आम्ही ताजे ताजे पदार्थच सर्व्ह करतो. काय नवीन आलात काय?

'तुम्ही कसं ओळखलं. श्रीकांत म्हणाला.

‘बास का साहेब, अहो गेली ३० वर्ष गल्ल्यावर बसतोय. पहिल्या नजरेत गिर्हाईक ताड़तो आम्ही’ असे म्हणत हॉटेल मालक हसले. आत बसण्याऐवजी श्रीकांत काउंटरजवळच्याच खुर्चीत बसला. आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. अजून रात्र न झाल्याने तसे गिर्हाईक फारसे नव्हते, मालकही निवांतच होते.

‘मी इथे बँक ऑफ बरोडा मध्ये ब्रँच मॅनेजर म्हणून बदलून आलोय’ श्रीकांतने सांगितले. मालकाने त्याच्याकडे आदराने पाहत म्हटले 'वा साहेब, म्हणजे आता आपली भेट होतच राहणार, आमचे खातेही तिथेच आहे. काय घेणार साहेब, चहा कि थंड? श्रीकांत नाही म्हणाला तरी पण मालकाने आग्रहाने पोऱ्याला चहा आणायला सांगितले.

'‘आणि ऐक रे, ग्लासात नको, कपबशीत आन.’ मालकांनी पोऱ्याला तंबी दिली.

वेटरने दिलेला चहा घेत श्रीकांत आजूबाजूचे निरीक्षण करत होता. चौकात बऱ्यापैकी वर्दळ दिसत होती.

'कधीपर्यंत चालू असते हॉटेल? श्रीकांतने विचारले. ‘तसे १०-१०.३० पर्यंत असतोच कि आंम्ही’ मालक म्हणाले.

'राहायला कुठे सोय केलीय?.. मालकांनी चौकशी केली. ‘इकडे त्या कोंढवा रोडला ‘अनुग्रह’ बंगला आहे ना, तो भाड्याने घेतलाय मी’ श्रीकांतने सांगितल्याबरोबर मालकांनी चमकून त्याच्याकडे पहिले. 'त्या अल्ताफ ने दाखवला काय तुम्हाला बंगला? मालकांनी त्राग्यानेच श्रीकांतला विचारले.

'हो, काय झाले?.. ‘अहो साहेब, जरा लोकल माणसाकडे चौकशी करायची. त्याला काय गिर्हाईक मिळतंय म्हटल्यावर कशाला सोडतोय’. मालक जरा रागानेच म्हणाले.

‘त्या बंगल्यात कोणी राहत नाही, जरा अडचणीचं काम आहे म्हणा नां’ मालकांनी सांगितले. पण थोडेसे हसत श्रीकांतच म्हणाला ‘अहो, मला अल्ताफभाईंनी कल्पना दिली होती. पण माझा काय अशा गोष्टींवर विश्वास नाही. आणि एवढा चांगला बंगला इतक्या कमी भाड्यात मिळतोय, मग काय हरकत आहे’

’ साहेब, तुमचा नसेल विश्वास पण अनेकांना प्रचिती आलीय. तिकडे कुणी फिरकत नाही. पण कोणी गेलेच तर बंगल्यात काही आवाज येतात आणि काही सावल्या दिसतात. बघा, अजून वेळ गेलेली नाही. मी गावात चांगली जागा बघून देतो. हवेतर आजच्या दिवस इथेच वरच्या मजल्यावर माझी आरामाची एक खोली आहे, तिथे राहा.’ मालक काळजीने सल्ला देत होते.

‘काका, तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल मी खरंच तुमचा खूप आभारी आहे. पण मला वाटते तिथेच राहावे. मी आजवर कुणाचं वाईट केलेलं नाही, बघू काय होतंय ते’ श्रीकांत उठत म्हणाला.

एव्हाना वेटरने त्याचे पार्सल आणून ठेवले होते. श्रीकांतने पाकीट काढून किती झाले म्हणून विचारले, त्यावर मालक म्हणाले ‘राहू द्या साहेब, आज तुम्ही आमचे पाहूने’ उद्या द्या हवेतर. पण श्रीकांतला हे काही पसंत नव्हते. ‘असे नाही काका, घ्या तुम्ही पैसे, मला नाही बरे वाटणार. एवढी आपुलकीने माझी चोकशी केलीत हेच खूप झाले.’

बऱ्याच आग्रहाने मालकांनी पैसे घेतले पण काउंटर शेजारच्या फ्रिजमधून आईस्क्रीमचे दोन कोण त्याच्या पार्सल मध्ये टाकले. आणि म्हणाले ‘साहेब, काळजी घ्या. काही वाटले तर कधीही इथे या, मी नसलो तरी पोरांना सांगून जातो, तुमची व्यवस्था होईल.’ एवढ्या प्रेमळ माणसाचे पुन्हा एकदा आभार मानत श्रीकांत पार्सल घेऊन हॉटेल मधून बाहेर पडला. चौकातून बंगल्याकडे वळताने त्याने पुन्हा एकदा हॉटेल कडे नजर टाकली. हॉटेल मालक त्याच्याकडेच बघत होते. त्यांना हात करत श्रीकांत रस्त्याला लागला.

एव्हाना दिवस मावळला होता पण संधिप्रकाश मात्र भरपूर होता. रमत गमत श्रीकांत चालला होता. वस्ती संपून निर्जन एरिया सुरु झाला होता. मनातल्या मनात श्रीकांत हॉटेल मालकांच्या बोलण्यावर विचार करत होता. १५ मिनिटानंतर श्रीकांत बंगल्याजवळ पोहोचला. खिशातून चावी काढून त्याने गेट उघडले. आजूबाजूला नजर टाकत तो व्हरांड्यात आला आणि दुसऱ्या चावीने त्याने मुख्य दरवाजा उघडला. तेवढ्यात काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज झाला. नाही म्हटलं तरी श्रीकांतच्या छातीत धस्स झालं. पण पुन्हा बिनधास्त होत त्याने लाईट लावली. अन समोर बघितलं तर किचनच्या दरवाज्यावरील पडदा हालत असल्यासारखे त्याला वाटले. मघाचा आवाजही किचन मधूनच आला होता. त्याने पुढे होत किचनची लाईट लावली. समोर एक पातेले पडलेले होते. दरवाजा खिडक्या बंद होत्या. पण तरीही त्याने असा विचार केला कि एखादा उंदीर किंवा मांजर पळल्यामुळे पातेले पडले असेल. त्याने पातेले उचलून जागेवर ठेवले. तो पुन्हा हॉलमध्ये आला. केबल कनेक्शन चालू असण्याची श्यक्यता नव्हतीच पण सहज म्हणून त्याने रिमोट घेऊन टी.व्ही. चालू केला आणि ‘टाटा-स्काय’ सुरु झाले. मनोमन पुन्हा एकदा अल्ताफभाईंच्या सर्व्हिसला दाद देत त्याने कुठलासा एक म्युझिक चॅनल चालू करून ठेवला. आपली बॅग उघडून त्याने टॉवेल आणि इतर कपडे काढले. मग बॅग उचलून तो बेडरूम मध्ये गेला आणि त्याने कपाट उघडून आपले कपडे त्यात ठेवले.

श्रीकांत टॉवेल घेऊन बाथरूम मध्ये गेला. नळ सुरु केला तर एका नळाला गरम पाणी येत होतं. त्या थोड्याशा गार वातावरणात त्याला गरम पाणी खूपच बरं वाटलं. हातपाय धुण्यासाठी गेलेला श्रीकांत मस्त पैकी आंघोळ करूनच बाहेर पडला. बाथरूम मधून बाहेर पडल्यावर त्याला आतापर्यंत न जाणवलेली एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे घरभर रेंगाळणारा मोगऱ्याचा वास. त्याने दीर्घ श्वास घेऊन समाधानाने मान हलवली. त्याने खिडकीतून बाहेर डोकावत बागेत मोगऱ्याचे झाड दिसतंय का हे बघायचा प्रयत्न केला पण एव्हाना बाहेर चांगलाच अंधार झाला होता. सकाळी बघू म्हणत श्रीकांत हॉल मध्ये आला. घरातले सगळे दिवे चालू करून त्याने घरभर एक व्यवस्थित चक्कर मारली. हॉल मधूनच एक जिना वरच्या मजल्यावर जात होता. क्षणभर त्याने वरच्या मजल्यावर एक चक्कर टाकावी असा विचार केला पण नंतर ‘बघू सकाळी’ असे म्हणत सोफ्यावर बैठक मारली. पण लगेच पुन्हा उठत तो बेडरूम मध्ये गेला आणि बॅगेतून ‘ब्लेंडर्स प्राईड’ ची बाटली घेऊन आला. ही सोय त्याने पुण्याहून निघतानेच करून ठेवली होती. किचन मध्ये जाऊन त्याने कपाटातील एक ग्लास, फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली घेतली व पुन्हा हॉल मध्ये येऊन बसला.

समोर टीव्हीवर त्याने कुठलासा एक सिनेमा लावला. छानसा पेग भरून घेतला आणि स्वतःलाच चिअर्स म्हणत तोंडाला लावला. एक घोट घेत 'वा! मस्त! अशी स्वतःलाच शाबासकी देत आरामात रेलून बसला. रोज एक पेग घ्यायची श्रीकांतची नेहमीची सवय. पुण्यातील त्याच्या घरचे वातावरण अगदी अल्ट्रा-मॉडर्न होते. श्रीकांत एखादा पेग रोज घेतो हे श्रीकांतच्या आई-बाबांनाहि कल्पना होती. मूळची ही सवय श्रीकांतच्या बाबांची, निळकंठरावांची. गेली कित्त्येक वर्ष ते नित्यनेमाने एक व्हिस्कीचा मध्यम पेग घ्यायचे. तोही या दोघांदेखत. लपून छपून नाही. पण एक म्हणजे एकच. कधीही एकाचे दोन पेग झालेले नव्हते. त्या छोट्याशा पेगने निळकंठरावांचा मूड छान असतो, जेवण हसत खेळत होते हे कळल्यामुळे लतिकाबाईंची, श्रीकांतच्या आईचीही काही तक्रार नसायची. कधी कधी निळकंठराव खूपच खुशीत असले कि श्रीकांतलाही एखादा अगदी छोटा पेग द्यायचे. लतिकाबाई रागवायच्या. 'अशाने तो बिघडेल, त्याला व्यसन लागेल अशी तक्रार करायच्या. पण 'एवढी वर्षे मी पितो, लागलेय का मला व्यसन? असे म्हणत हसून सोडून द्यायचे. पण त्याचवेळी श्रीकांतला मात्र सल्ला द्यायला विसरायचे नाहीत. ‘शिऱ्या, प्रमाणात घेतले कि हे वाईट नाही पण मर्यादा ओलांडली तर मात्र याच्यापेक्षा घातक काही नाही, हे कायम लक्षात ठेव’

घोट घेता घेता श्रीकांतला या प्रसंगाची आठवण झाली आणि आपण आईबाबांना एकटे सोडून आलो याचे क्षणभर वाईटही वाटले. पण खरेतर श्रीकांतचे आईबाबा दोघेही अगदी ठणठणीत होते आणि आपली काळजी घ्यायला समर्थ होते. शिवाय घरात असलेली शोभा मावशी अगदी श्रीकांतच्या जन्मापासून होती, ती या दोघांची काळजी घेणारीच होती. शिवाय अडीअडचणीला, गणपतकाका ड्रायव्हर आणि अनेक वर्षे असलेला सदा माळीही होते.

पुण्याच्या घरात रमलेले श्रीकांतचे मन पुन्हा भरतपूरच्या बंगल्यात आले. एव्हाना एक पेग संपला होता. श्रीकांत आज जरा जास्तच खुशीत होता. हा बंगला त्याला अगदी मनापासून आवडला होता. शिवाय असा शांत एकांत त्याला नवीनच अनुभूती देत होता. श्रीकांतने घरातला पायंडा मोडत दुसरा पेग भरून घेतला. चॅनल बदलून ‘हेराफेरी’ हा विनोदी सिनेमा लावला. तशी त्याला काही घाई नव्हती. भरपूर वेळ होता, एकटेपण निवांत एन्जॉय करत तो ब्लेंडर्सचे सिप मारत होता. सगळीकडे रेंगाळणारा मोगऱ्याचा वास मन धुंद करून टाकत होता. त्याचा उगम मात्र त्याला कुठे सापडत नव्हता. तेवढ्यात काहीतरी पडल्याचा धाडकन आवाज झाला. हा आवाज किचनकडूनच आला होता. त्याने टीव्हीचा आवाज म्यूट करून अंदाज घेतला, पण पुढे कुठलाही आवाज आला नाही. किचनच्या दरवाज्यावरील पडदा मात्र मघासारखाच हालत होता. थंडीचे दिवस अगदी सुरु झाले नसले तरी हवा बऱ्यापैकी गार होती. तरीपण हॉल मधला फॅन त्याने अगदी हळू चालू ठेवला होता. पण एवढा वेळ त्या फॅनने पडदा हलला नाही आणि आताच कसा हालतोय याचे त्याला आश्चर्य वाटले. हातातला ग्लास टीपॉयवर ठेवत श्रीकांत उठला आणि किचनच्या दरवाजात जाऊन क्षणभर थांबला. किचनमधली लाईट बंद असली तरी हॉलमधील प्रकाश आत येत होता. तरीपण त्याने बटन दाबून लाईट लावला. आणि बघितले तर मघाशीच त्याने उचलून ठेवलेले तेच पातेले पुन्हा खाली पडलेले होते. त्याने ते उचलून, निरखून बघत पुन्हा जागेवर ठेवले. खिडकी पुन्हा चेक केली. खिडकी व्यवस्थित बंद होती, शिवाय बाहेर वाराही नव्हता आणि वाऱ्याने पडावे एवढे ते पातेलेही हलके नव्हते. एखादे मांजर असते तर एवढ्या वेळात नक्कीच दिसले असते. उंदीर एवढे पातेले पाडू शकेल काय असा मनाशी विचार करत तो पुन्हा हॉलमध्ये येऊन बसला. यावेळी मात्र किचनची लाईट त्याने चालूच ठेवली.

त्या व्यत्ययामुळे नाही म्हटले तरी त्याचा मस्त मूड जरा डिस्टर्ब् झालाच होता. श्रीकांत तसा भिणाऱ्यातला नक्कीच नव्हता. उलट अशा भुताखेतांच्या गोष्टी कोणी सांगायला लागले तर त्याची खिल्ली उडवायला श्रीकांत नेहमी पुढे असायचा. श्रीकांतचा जसा भुतावर विश्वास नव्हता, तसाच देवावरही नव्हता. श्रीकांतच्या मनातील देवाची व्याख्या फार वेगळी होती. देवळात दिसतो त्या देवावर त्याला विश्वास नव्हता. तिथल्या धार्मिक कार्यात होणाऱ्या पूजापाठावरही त्याचा विश्वास नव्हता. सत्यनारायणासारखे पूजाप्रकार म्हणजे तर कुना हुशार ब्राह्मणाच्या डोक्यातून आलेली एक कल्पनाच असून त्या माणसाने ही काल्पनिक कथा लिहून, त्याचा संबंध कर्मकांडाशी जोडून, आणि लोकांच्या मनातील भीती आणि श्रद्धा यांची छान सरमिसळ करून आपली पोटापाण्याची तह-हयात सोय करून टाकली असावी असे श्रीकांतचे स्पष्ट मत होते. पण याचा अर्थ श्रीकांत देवाचे अस्तित्व पूर्ण नाकारणाराही नव्हता. मानवाच्या ताकदीच्या, बुद्धीच्या कल्पनेकडची एखादी अद्वितीय शक्ती अस्तित्वात आहे आणि त्या शक्तीचेच प्रतिनिधीत्व करणारा हा निसर्ग आहे याच्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे श्रीकांत कधी कुठल्या मंदिरात जात नसला तरीही ही धरती, समुद्र, वारा, डोंगर, नद्या, आकाश यांना मात्र तो मनोभावे हात जोडत होता.

श्रीकांतच्या तरल झालेल्या मनात हे विचार भरभर तरळून जात होते. शेवटी गेलेला मूड परत आणण्यासाठी म्हणून बहाणा शोधत त्याने अजून एक पेग भरला आणि सिनेमा बघू लागला. तिसरा पेग संपल्यावर मात्र त्याने ग्लास बाजूला ठेवला. आतामात्र त्याच्या शरीरावर दारूचा अम्मल चांगलाच जाणवू लागला होता. भूकही कडकडून लागली होती. त्याने आणलेल्या पार्सलचे डबे उघडले आणि प्लेट वगैरे घेण्याच्या फंदात न पडता त्याने जेवण सुरु केले. जेवण अतिशय चवदार होते. पुणेरी मिळमिळीत मसाल्यापेक्षा ही किंचित तिखट आणि अस्सल कोकणी चव असलेली पनीरची भाजी एकदम आवडून गेली. डब्यातील गरम गरम जिरा राईसही त्याने संपवला आणि मग मात्र त्याला एकदम सुस्ती आली. समोरचे सगळे आवरण्याच्या नादाला न लागता त्याने बेसिनवर कसेबसे हात धुतले आणि बेडरूम मध्ये जात बेडवर अंग झोकून दिले. येताने टीव्ही मात्र त्याने आठवणीने बंद केला होता. बेडवर पडल्यावर काही क्षणातच त्याला अतिशय गाढ झोप लागून गेली. मधेच कधीतरी किचमधून आलेल्या काहीतरी पडल्याच्या आवाजाने त्याची झोप चाळवली पण उठण्याची तसदी न घेता तो तसाच झोपून गेला. पहाटे पहाटे चांगलाच गारठा वाढला होता. अंगावर पांघरून घ्यावे असे त्याला वाटले पण उठून कपाटातून पांघरून काढायचा कंटाळा आल्याने तसेच पोटाशी पाय घेऊन श्रीकांत पुन्हा झोपेच्या आधीन झाला.

गाढ झोपेतून श्रीकांत जागा झाला तो बाहेर बागेत कोणीतरी झाडत असल्याच्या आवाजाने. त्याने उठून अंगाला आळोखे पिळोखे दिले. बेडवरुन उठताने त्याला आपल्या बेडवर पडलेले त्याचे पांघरून दिसले. त्याने पांघरून हातात घेत आठवायचा प्रयत्न केला कि आपण हे पांघरून कपाटातून कधी काढले. पण त्याला काही आठवत नव्हते. कदाचित कालच्या ड्रिंक्सचा परिणाम असावा असे त्याला वाटले. त्याने पांघरुणाची घडी घालून ते पुन्हा कपाटात ठेवले आणि अंगावर टी शर्ट अडकवत तो बाहेरचा दरवाजा उघडून व्हरांड्यात आला. बागेत तर कोणीही नव्हते. मनाशी आश्चर्य करत त्याने संपूर्ण बंगल्याला एक चक्कर मारली. कोणीही दिसले नाही पण बागेतला पालापाचोळा मात्र स्वच्छ केलेला दिसत होता. मघाशी आपण ऐकला तो आवाज झाडलोट करण्याचाच होता हेही त्याला खात्रीने वाटत होते. पण हे केले कोणी हे मात्र कळत नव्हते. कदाचित अल्ताफभाईंनीच बागेची साफसफाई करण्यासाठी कोणी माणूस ठेवलेला असेल आणि आपण उठेपर्यंत तो सफाई उरकून निघून गेला असेल अशी मनाची समजूत घालत तो पुन्हा आत आला. एवढ्या वेळात त्याचे घड्याळाकडे लक्षच गेले नव्हते. चांगले आठ वाजले होते. मग मात्र तो घाईघाईने बाथरूम मध्ये शिरला आणि भराभरा आवरत बँकेत जायला तयार झाला. हॉलमध्ये येताच मात्र त्याच्या लक्षात ना आलेली एक गोष्ट दिसली. आपण रात्री झोपायला जाताने सगळे साहित्य, तसेच टेबलवर सोडल्याचे त्याला पक्के आठवत होते. पण आता मात्र ते सगळे आवरून ठेवलेले होते. सगळे खरकटे डबे गायब होते. त्याची ब्लेंडर्सची बाटली व्यवस्थित बंद करून एका कडेला ठेवलेली होती. आतामात्र श्रीकांतला विचार करावासा वाटला. आपल्याव्यतिरिक्त या घरात कोणीतरी वावरतंय अशी शंका यायला लागली, पण तेवढ्यात पुन्हा त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले आणि ‘बघू संध्याकाळी’ असे मनाला बजावत आणि आपली पाठीवरची सॅक हातात घेत तो बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने कुलूप लावले आणि काय वाटले कोणास ठाऊक, पण संपूर्ण बंगल्याला एक चक्कर मारत आत जायला दुसरी कुठली जागा आहे का हे बघितले. किचनच्या बाहेर वॉशिंग प्लेस मध्ये उघडणारा एक दरवाजा होता. तो त्याने आतून बंद असल्याचे पहिले होते. त्याने तो दरवाजा बाहेरून ढकलून पाहीला पण तो आतूनच घट्ट बंद होता. मग मात्र वेळ न दवडता गेट बंद करून घेत तो रस्त्याला लागला. रस्त्यावर आल्यावर मात्र त्याला जाणवले कि आपल्याला वाहनाची काहीतरी सोय करावी लागेल. रोज हे चौकापर्यंत पायी जाणे शक्य नाही. तशी त्याची जुनी सँट्रो पुण्यात होती. आईबाबांना त्यांची वेगळी गाडी असल्याने सँट्रो तो घेऊन येऊ शकत होता. पण किमान हा आठवडा तरी त्याला काहीतरी ऍडजेस्टमेंट करावी लागणार होती. अल्ताफभाई शी बोलून त्यांनाच तात्पुरती गाडीची व्यवस्था करायला सांगायचे असे त्याने मनाशी ठरवले.

नरवीर तानाजी चौकात यायलाच त्याला १० मिनिटे लागली. कोकण-किनारा मध्ये त्याने गरमागरम पोह्यांचा नाश्ता केला. काउंटरवर २२-२३ वर्षांचा एक तरुण बसलेला होता. बिल देताने त्याने काऊंटरवरील त्या तरुणाला विचारले,

'काल इथे होते, ते मालक कुठे आहेत?

''ते माझे वडील, दुपारनंतर असतात इथे, सकाळी मी असतो. काही प्रॉब्लेम आहे का साहेब? तरुणाने आर्जवाने विचारले.

'‘नाही हो, सहज विचारले’ असे म्ह्नत श्रीकांत बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने रिक्षा पकडली आणि बँक गाठली. बँक उघडलेली दिसत होती. पण अजून ग्राहकांसाठी प्रवेश सुरु झालेला नव्हता त्यामुळे दारातील शिपायाने श्रीकांतला आडवले.

‘मी श्रीकांत साठे, इथे ब्रँच मॅनेजर म्हणून आलोयं’ श्रीकांतने त्याला सांगितले.

शिपायाने त्याला सलाम ठोकत अदबीने दरवाजा उघडला आणि म्हणाला

‘माफी करा साहेब, मी ओळखले नाही तुम्हाला’ त्याचा ओशाळलेला चेहरा बघून श्रीकांतच म्हणाला

'अरे काही हरकत नाही, तू तुझे काम अगदी योग्य केलंस. मी पहिल्यांदाच आलोय तर तू कसा ओळखणार?

असा शिपायाला दिलासा देत श्रीकांत आत आला. बरीचशी स्टाफची माणसे आलेली दिसत होती. सर्वांना ‘गुड मॉर्निंग’ म्हणत तो ब्रँच मॅनेजर असे लिहिलेल्या केबिन मध्ये गेला. एकदा त्याने केबिन व्यवस्थित बघून घेतली आणि मनाशी समाधान मानत समोरचा कॉम्प्युटर सुरु केला. पण पासवर्ड ला मात्र अडचण आली. बेल दाबून श्रीकांत शिपायाला बोलावणार तेवढ्यात एक गृहस्थ दरवाजा ढकलून ''आत येऊ का सर? असे म्हणाले. श्रीकांतने त्यांना आत बोलावले, त्यांच्या मागोमाग सगळाच स्टाफ आत आला. त्यातील एकाच्या हातात मोठा बुके होता. सर्वांनी श्रीकांतचे स्वागत करत त्याला बुके दिला आणि सर्वांच्या ओळखी करून दिल्या. श्रीकांतनेही सर्वांशी हसत बोलत आपल्या स्वभावाची ओळख करून दिली. सगळेजण बाहेर पडत असतानेच श्रीकांत म्हणाला ‘अहो गोखले, जरा याचा पासवर्ड सांगा’… गोखल्यांनी सांगण्याऐवजी एका कागदावर तो लिहिला आणि रोज त्यात कसे बदल होतात त्याचा क्रम सांगितला. त्यांचे आभार मानत श्रीकांत कामाला लागला. नंतर श्रीकांत कामात एवढा गढून गेला कि तो बंगलाही विसरला आणि अल्ताफभाईंना फोन करण्याचंही विसरून गेला. पण साडेदहाला अल्ताफभाईंनीच फोन केला. ''नमस्कार साठे साहेब, मी अल्ताफ. कशी काय गेली बंगल्यातील पहिली रात्र?

त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखत श्रीकांत म्हणाला

‘‘अगदी मस्त! काहीही अडचण नाही. माझ्यासाठी एक फक्त कराल का? चार-पाच दिवसांसाठी एखादी टू व्हीलर मिळतेय का बघा भाड्याने. जायला यायला अडचण होतेय. रिक्षावाले चौकाच्या पुढे येत नाहीत. असे किनारा हॉटेलवाले काणे म्हणाले’’

'‘बरोबर, त्यांना व्यवस्थित कल्पना असेल. पण तुम्ही काही काळजी करू नका, माझ्याकडेच एक्सट्रा गाडी आहे मुलाची. तीच देतो तुम्हाला काही दिवस’… अल्ताफने सांगितले.

‘अरे मग काय मस्तच, काम झाले. शनिवार रविवार पुण्याला गेलो कि माझी सँट्रो घेऊनच येतो’ श्रीकांत म्हणाला.

'‘अल्ताफभाई तुमचे खरंच खूप खूप आभार बरं का? आणि तेवढा तो सकाळचा झाडलोट करणारा माणूस तुम्ही ठेवलाय ना त्याला मला भेटून जायला सांगा.’

श्रीकांत असे म्हणल्यावर काही काळ फोनवर शांतता पसरली. श्रीकांतने दोन तीन वेळा हॅलो हॅलो केल्यावर अल्ताफभाईंचा आवाज आला.

'‘श्रीकांत साहेब, पण मी काय म्हणतोय, तुम्ही गावातीलच जागा बघितली तर बरे होईल, जायचा यायलाही त्रास होणार नाही’ काल काहीतरी घडलंय याचा अंदाज बांधत अल्ताफभाई म्हणाले.

'‘पण का, कशासाठी?एवढी चांगली जागा का सोडायची? मला तर आवडलाय बंगला’ श्रीकांत ठामपणे म्हणाला.

'‘साहेब, स्पष्ट सांगतो. मी कुठलाही माणूस सफाईला ठेवलेला नाही. आणि तो बंगलाही वर्ष-दोन वर्ष बंद होता. काल एवढा चकाचक बघितल्यावर मी पण हादरून गेलो होतो.’ अखेर अल्ताफने सरळ सांगून टाकले.

त्यांचे ऐकून श्रीकांतही जरा विचारात पडला आणि काल रात्रींचे छोटे छोटे प्रसंग त्याला आठवले. पण तरीही ठाम निर्धाराने तो म्हणाला ‘भाई, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. काय असेल ते मी बघतो, तुम्ही फक्त गाडीची व्यवस्था बघा. जमल्यास आजच आणून द्या’… असे म्हणत त्याने फोन बंद केला. पण कामात म्हणावे असे लक्ष काही लागत नव्हते. अर्थात तो काही घाबरला नव्हता, पण मनात एक कुतूहल जागे झाले होते कि नक्की काय असेल, खरंच भूत असेल?

लंच टाइम झाल्यानंतर त्याने शिपायाला सांगून कँटिनमधून जेवण मागवले आणि जेवण उरकून पुन्हा कामात लक्ष गुंतवले. थोड्या वेळाने अल्ताफभाई स्वतःच दरवाजा ढकलून आत आले. नमस्कार चमत्कार झाल्यावर अल्ताफभाईंनी परत एकदा श्रीकांतचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण श्रीकांत काही बधला नाही. मग त्यांनी खिशातून स्प्लेंडरची चावी काढून टेबलवर ठेवली. आणि म्हणाले ‘बाहेर स्प्लेंडर ३३६६ उभी आहे. येतानेच पेट्रोल टाकलंय, हवे तेवढे दिवस वापरा.’ श्रीकांतने पाकीट काढून म्हटले ''भाई तुमचे पुन्हा एकदा आभार. मला अगदी परफेक्ट सर्व्हिस देताय तुम्ही. बरं पेट्रोलचे आणि गाडी भाड्याचे किती पैसे द्यायचे?

'राहू द्या हो श्रीकांत साहेब, एवढेशे काय पैसे घ्यायचे? आणि तुम्ही परके थोडेच आहात? असे हसून म्हणत अल्ताफभाई बाहेर पडले.

पाच वाजता श्रीकांतने कॉम्प्युटर बंद केला आणि सॅक घेऊन बाहेर पडला. बाकीचा स्टाफही निघण्याच्या तयारीतच होता. सगळ्यांना बाय करत श्रीकांत बाहेर पडणार तेवढ्यात गोखलेंनी त्याला थांबवले.

'साहेब सकाळी विचारायचेच राहून गेले पण अल्ताफ येऊन गेला तेंव्हाच कळले कि तुम्ही राहण्याची सोय केलेली दिसते. कुठे राहिला आहात?

‘कोंढवा रोडला ‘अनुग्रह’ बंगला आहे तोच भाड्याने घेतलाय’ श्रीकांत म्हणाला.

तसे गोखल्यानी चमकून त्याच्याकडे बघितलं.

'‘साहेब, माफ करा पण गावातही तुम्हाला जागा मिळेल. त्या बंगल्याबद्दल फार चांगले बोलले जात नाही’

गोखले काळजीने म्हणाले. पण यावर श्रीकांत हसत म्हणाला ,

‘असे काही नसते हो, मला बंगला फार आवडलाय. अगदी मस्त, निवांत आहे आणि सर्व सोयीसुविधाही आहेत तिथे’ काही काळजी करू नका’

असे म्हणत श्रीकांत बाहेर पडला. बाहेर येऊन त्याने बघितले तर ३३६६ नंबरची स्प्लेंडर समोरच उभी होती. सॅक पाठीवर लावत त्याने गाडी स्टार्ट करून गेटच्या बाहेर काढली व घराकडे निघाला. श्रीकांत जाताच स्टाफ मधील लोक आपापसात चर्चा करत, साहेबांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करू लागले.

श्रीकांत नरवीर तानाजी चौकात आला आणि गाडी लावत ‘कोकण-किनारा’ हॉटेलमध्ये शिरला. काउंटरवर मालक ‘काणे’ बसलेले दिसले. त्यांनी श्रीकांतचे हसून स्वागत केलं आणि पोऱ्याला हाक मारत साहेबांना काय हवे ते बघ म्हणून सांगितले. श्रीकांतने फक्त चहा घेतला आणि काउंटरवर आला. ''काय साहेब, कसा गेला कालचा आणि आजचा दिवस? काही अडचण नाही ना? असे आपुलकीने विचारले.

‘एकदम छान काका, काही प्रॉब्लेम नाही. जायची यायचीही सोय झालीये. आठ-साडेआठला येतो जेवायला’ श्रीकांतने त्यांना काका म्हटलेले काणेंना आवडले.

‘काळजी घ्या साहेब, काही लागल्यास हक्काने सांगा’ असे म्हणत जाता जाता काणेंनी आपुलकी दाखवली.

श्रीकांत बंगल्याजवळ आला. गेट उघडून गाडी आत घेतली. सॅक मधून चावी काढून दाराला लावली पण दार न उघडता तो पुन्हा व्हरांड्यातून खाली आला आणि बागेतून चालत बंगल्याभोवती चक्कर मारली. बाग फार मोठी नसली तरी अगदी व्यवस्थित राखलेली दिसत होती. पण तरीही काहीतरी खटकत होते. विचार केल्यावर त्याच्या लक्षात आले कि कालपासून सगळ्या बंगल्यात मोगऱ्याचा सुंदर वास येतोय पण बागेत मात्र मोगऱ्याचे झाड कुठंही नाही. त्याने गेट उघडून बाहेर येत आजूबाजूलाही बघितले. ही बाग सोडली तर मुख्य रस्त्यापर्यंत कुठेलेही झाड नव्हते. आश्चर्य करत त्याने दरवाजा उघडला आणि काही क्षण दारातच उभे राहून अंदाज घेतला. पण आत एकदम शान्तता होती. मोगऱ्याचा वास मात्र आत्ताच स्प्रे मारल्यासारखा येत होता. आत आला तर किचनच्या दरवाजावरचा पडदा अगदी त्याच्यासमोर हलला जसे काही कुणीतरी पडदा सरकवून आत गेले किंवा बाहेर आले असावे. त्याने सॅक समोरच्या सोफ्यावर टाकली आणि सर्व घर फिरून बघितले. हॉल मधूनच एक जिना वर जात होता, त्या जिन्याने तो वर आला. वर एक अटॅचड टॉयलेटसह बेडरूम होते. समोरचा दरवाजा बाहेर टेरेस वर उघडत होता. टेरेसवर उभे राहून त्याने सर्वदूर नज़र फिरवली. दक्षिणेकडे शहर दिसत होते, पश्चिमेला डोंगरांची रांग होती. उत्तरेलाही दूरवर डोंगर होते आणि त्याच्या पोटाशी एक छोटीशी वस्ती दिसत होती. कालपासून घडणाऱ्या छोट्या छोट्या घटना सोडल्या तर तो संपूर्ण बंगला अगदी आदर्श होता.

श्रीकांत पुन्हा खाली आला. सोफ्यावरील सॅक उचलून बेडरूमच्या कपाटात ठेवली आणि कपडे बदलत बाथरूममध्ये घुसला. हातपाय धुऊन त्याने सकाळी बारवर वाळत टाकलेला टॉवेल घेण्यासाठी हात वर केला आणि थबकला. बारवर ना त्याचा टॉवेल होता ना बनियान-अंडरवेअर. आता मात्र त्याच्या मनात अनेक शंका उत्पन्न होऊ लागल्या. तसेच ओल्या अंगाने बाहेर येत त्याने किचन शेजारचा बाहेर वॉशिंग प्लेस मध्ये जाणारा दरवाजा उघडला आणि जागेवर स्तब्ध उभा राहिला. तिथल्या दोरीवर त्याचे कपडे वाळत होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे टॉवेलसकट ते व्यवस्थित धुऊन टाकलेले होते. त्याने टॉवेल काढून घेतला आणि हातपाय पुसून परत तिथेच वाळत टाकला व तो हॉल मध्ये आला.

समोर सोफ्यावर बसत त्याने समोर किचनकडे बघत खणखणीत आवाजात हाक मारली.

‘कोण आहे आत, असा लपाछपीचा खेळ खेळण्यापेक्षा माझ्या समोर या.’

पण काहीही हालचाल दिसली नाही.

‘हे बघा, माझ्या अपरोक्ष तुम्ही इथे राहत आहात हे मला कळलंय. मला घाबरवून मी इथून निघून जाईल असे तुम्हाला वाटत असेल तर ते होणार नाही. मी कशालाही भीत नाही’ श्रीकांत चांगलाच दरडावून बोलला.

एवढे बोलूनही काहीच आवाज नाही. श्रीकांतला कळेना कि जे घडतंय ते खरंच आहे कि आपल्यालाच भास होताहेत. त्याने थोडावेळ वाट पाहून टीव्ही सुरु केला आणि त्यात रमून गेला. एक कान मात्र कुठे काही आवाज येतात का हे ऐकण्यात गुंतलेला होता. एव्हाना बाहेर अंधार दाटून आला होता. थोड्या वेळाने त्याने कालची ब्लेंडर्सची बाटली आणि ग्लास काढला. किचनमधल्या फ्रिजमधून एक थंड पाण्याची बाटली आणली. त्याने एक पेग भरला आणि किचनकडे बघत ‘चिअर्स’ असे खणखणीत आवाजात म्हणत ग्लास ओठाला लावला. दोन घोट घेतल्यावर त्याला वाटले कि काहीतरी खायला आणायला पाहिजे होते. फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्यांशिवाय काही नाही हे त्याने मघाशीच बघितले होते. आणि तेवढ्यात किचनमधून कालसारखाच पातेले पडल्याचा आवाज आला. धावतपळत तो किचन मध्ये आला. कालच्यासारखेच तेच पातेले पडलेले होते. त्याने ते उचलून जागेवर ठेवले आणि परत येताने त्याचे लक्ष डायनिंग टेबलवर गेले. आणि त्याला धक्काच बसला. त्या टेबलवर दोन डिश ठेवलेल्या होत्या आणि त्यात खारवलेले काजू आणि वेफर्स होते. हे पदार्थ काही क्षणापुर्वी इथे नव्हते हे त्याला पक्के ठाऊक होते. आत्ताच कोणीतरी ते टेबलवर ठेवले होते आणि हेही त्याच्या लक्षात आले कि आताचे पातेले पडणे हे त्याला घाबरवण्यासाठी नसून किचनमध्ये बोलावण्यासाठीच होते. त्याने अगदी बारकाईने किचनच्या सर्व भिंती तपासल्या. कपाट उघडून आत बघितले. बाहेरचा दरवाजा बंद होता तोही उघडून बाहेर कोणी आहे का ते बघितले, पण कुठेही कोणी नव्हते. त्या डिश घेऊन तो पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. पण मनात मात्र विचारांची मालिका सुरु झाली होती. भुताखेतांवर त्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे इथे जे काही घडतंय ते कोना माणसाचेच काम आहे असे त्याला वाटत होते. पण कसे ते काही कळत नव्हते. मग त्याच्या मनात काल पासूनच्या घटना एक एक करून समोर यायला लागल्या. आणि जसजसा तो विचार करत गेला तसतसे त्याला वाटू लागले कि हे काही मानवी काम नाही. दोन वर्षे मोकळा पडून असलेला बंगला इतका चांगल्या स्वरूपात कसा? अल्ताफभाईने भाडयाने द्यायच्या अगोदर सफाई करून घेतली असेल असे मानले तरी बाहेरची बाग इतकी जिवंत कशी? केबल कनेक्शन, सोलर हिटर या वस्तू चालू अवस्थेतल्या कशा? बिल्कुलही वारा येत नाही तरी पडदा हालतोय, एकच पातेले परत परत खाली कसे पडतेय? आज पहाटे आपल्या अंगावर पांघरून कसे आले? आपले ओले कपडे धुऊन बाहेर कोणी वाळत घातले? आणि तो या निर्णयावर येऊन पोहोचला ‘‘काहीतरी आहे इथे’’…

आज एकच पेग झाल्यावर मात्र त्याने पिणे बंद केले आणि जेवायला जावे म्हणून आवरायला घेतले. रिकाम्या डिश ठेवायला म्हणून तो किचनमध्ये गेला. सगळेकाही ठीकठाक दिसत होते. कपडे आवरून तो हॉलमध्ये आला खरा पण खरेतर एवढ्या लांब जेवायला जायचा त्याला कंटाळा आला. सकाळी जे अंतर त्याने आरामात चालत पार केले तेच त्याला आता गाडी असूनही खूप लांब वाटायला लागले. काहीक्षण श्रीकांत तसाच विचार करत उभा राहिला आणि जाऊ द्या नको जेवायला जायला असे म्हणून तो कपडे बदलायला वळणार तेवढ्यात किचनमधून तोच चिरपरिचित आवाज आला आणि श्रीकांत किचनकडे पळाला. मागच्यावेळेप्रमाणेच कोणीही दिसले नाही पण टेबलवर मात्र बरेच काही ठेवलेलं होतं. कालच्यासारख्याच दोन रोटी, पनीर कढई, जिरा राईस आणि कालचीच आईस्क्रीम सुद्धा. यावेळी मात्र श्रीकांत नखशिखांत हादरला. त्याला अचानक खूप थंडी वाजून आल्यासारखे वाटले. आतापर्यंत जी भीती त्याला कधीच मनाला शिवली नव्हती त्या भीतीने त्याचे अंग अगदी शहारून गेले. त्या पदार्थांना स्पर्श करण्याऐवजी तो धडपडत हॉल मध्ये आला आणि बाटलीतून एक पेग ग्लासात ओतून घेत त्याने ते पेय घशाखाली ढकलले. त्या जळजळीत पेयाने त्याच्या अंगात एकदम उब आली. तो धपकन सोफ्यावर कोसळला आणि आपल्या भरकटलेल्या मनाला ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करू लागला. विचार करता करता तो एका ठाम निर्णयाशी येऊन पोहोचला कि इथे, या घरात आत्म्याचे अस्तित्व आहे. पण जे काही आहे ते त्याला त्रास देणारे नाही तर मदत करणारेच आहे. घाबरून जाण्यासारखे अजून काहीही घडलेले नाही.

श्रीकांत असाच आडवे तिडवे विचार करत असताने अचानक तोच पडदा पुन्हा हलला. ते पाहून श्रीकांत अगदी ताठ होऊन बसला. मोगऱ्याचा वास अगदी जवळून येऊ लागला आणि आपल्या जवळ कोणीतरी उभे असल्याचे त्याला जाणवले. नाही म्हणलं तरी त्याला मनातून पुन्हा भीती वाटलीच. त्याने आजूबाजूला नजर फिरवून बघितले पण काहीही दिसले नाही. आणि अचानक त्याला स्वताच्याच मनातून आवाज आल्यासारखे वाटले 'येताय ना जेवायला? श्रीकांत तटकन उभा राहिला आणि कान देऊन ऐकू लागला कि कोणी बोलतय का? पण नाही सगळी कडे चिडीचूप शांतता होती. त्याच्या डोक्यात मात्र काही आवाज घोंगावत होते. श्रीकांतची आई, किंवा शोभा मावशी स्वयंपाक घरात काम करत असताने जसे आवाज येतात तसे त्याला मनातून ऐकू येत होते. श्रीकांतने एकदा जोरजोरात डोके हलवून ते आवाज बंद करायचा प्रयत्न केले. सोफ्याच्या पाठीवर डोके टेकवून त्याने क्षणभर डोळे मिटून घेतले आणि पुन्हा तो आवाज आला. '‘उपाशी झोपणे बरे नाही, चला ना जेवायला’ यावेळी त्याला अगदी स्पष्ट आवाज ऐकू आला. आणि मन भरकटण्याऐवजी एकदम शांत झाले. स्वताच्याही नकळत तो उठला आणि किचनकडे चालू लागला. अगदी प्रसन्न मनाने त्याने जेवायला सुरुवात केली. त्याचे मन चेतन अवचेतन पातळीवर दोलायमान होत होतं. जे काही चाललंय ते खरे नाही आणि बरेही नाही हे त्याला कळत होते आणि त्याचवेळी अवचेतन मन मात्र सगळं आनंदाने एन्जॉय करत होते.

सर्व जेवण संपवून त्याने आईस्क्रीमचा कोण हातात घेतला आणि तो चघळत पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. त्याचे शरीर अतिशय हलके हलके झालेले होते पण त्याचवेळी डोळ्यावर एक सुस्ती पसरत चालली होती. आईस्क्रीमचा कोण त्याने कसाबसा संपवला आणि अगदी जड पावलांनी बेडपर्यंत पोहोचला. अंगावर पांघरुणंही न घेता अंगावरच्या बाहेर जायच्या कपड्यासकट तो गाढ झोपून गेला.

कालच्यासारखीच त्याला आजही जाग आली ती बाहेर बागेत कोणीतरी झाडलोट करत असल्याचा आवाज ऐकून. तो जागा झाल्यानंतर मात्र आवाज लगेच थांबला. श्रीकांत बेडवर उठून बसला आणि त्याला दिसले कि आपण अंगावर व्यवस्थित नाईट ड्रेस घालून झोपलेले होतो. बेडवर बसल्या बसल्याच डोळे बंद करून घेत त्याने कालचे सगळे प्रसंग आठवण्याचा प्रयत्न केला. सगळेकाही स्वच्छ आठवत होते. तो बाहेर जायला निघाल्यापासून चा सगळा प्रसंग त्याच्या डोळ्या समोरून तरळून गेला. कुणाच्यातरी आवाजाने आपण किचनमध्ये गेलो, जेवलॊ, आईस्क्रीम खाल्ले आणि सुस्ती आली म्हणून कपडे न बदलताच झोपून गेलो हे त्याला पक्के आठवत होते.

श्रीकांत उठून बाहेर आला. बाहेर बागेत चक्कर मारली. काल संध्याकाळी थोडा पालापाचोळा पडलेला दिसला होता पण आतामात्र सर्व स्वच्छ दिसत होते. आणि नुकतेच बागेला पाणी घातलेलंही दिसत होते. ओल्या मातीचा सुगंध येत होता. आत येत श्रीकांतने सर्व घरभर चक्कर मारली. काल रात्रीचा पसारा आवरलेला होता. भांडी स्वच्छ केलेली होती. टेबल रिकामे होते.

अंघोळ करावी म्हणून तो कालचे वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी किचनचा बाहेरचा दरवाजा उघडून बाहेर आला पण दोरीवर कपडे दिसले नाही. अगदी सवयीचे असल्यासारखा तो बाथरूममध्ये आला तर आतल्या बारवर कपडे आणि टॉवेल व्यवस्थित घडी घालून ठेवलेले त्याला दिसले. मनातल्या मनात हसत त्याने अंघोळ उरकली. ओले कपडे आणि कालचा ड्रेसही तसाच मुद्दाम बाथरूम मध्ये टाकत तो बेडरूम मध्ये आला. कपाटातून दुसरा ड्रेस काढून त्याने तो अंगावर चढवला आणि सॅक घेत बाहेर आला. आता तो बाहेर पडणार तेवढ्यात किचनमध्ये काही आवाज ऐकून तो आत गेला तर टेबलवर गरम गरम पोह्यांची डिश ठेवलेली दिसली. अगदी सरावल्यासारखा त्याने निवांतपणे नाश्ता उरकला आणि बाहेर पडला. बंगल्याचे कुलूप आठवणीने बंद करत त्याने गाडी गेटबाहेर काढली. पुन्हा उतरून गेट बंद केले आणि बँकेत जायला निघाला.

बँकेत अजून कोणी फारसे आलेले नव्हते. शिपायाने त्याला केबिन उघडून दिली आणि मनातला सर्व कोलाहल बंद करत तो कामात गढून गेला. लोक येत होते, जात होते, कामे चालू होती. मधेच अल्ताफभाईंचा फोन आला. त्यांनी कालच्याप्रमाणेच त्याची सारे काही ठीक आहे ना? म्हणून चौकशी केली. अगदी आश्वस्तपणे श्रीकांतने त्यांना सांगितले कि ‘सर्व काही ठीक आहे, काहीही काळजी करण्याची गरज नाही’. थोड्यावेळाने त्यालाच वाटले कि आपण किमान अल्ताफभाईंशी कालच्या प्रसंगाबद्दल बोलायला पाहिजे होते का? पण नकोच, आपण जे काही सांगू त्यावर कुणाचा विश्वास तर बसणार नाहीच. उलट काळजीपोटी भलतेच काही समोर यायचे. नकोच ते, आपले गुपित आपल्यापाशीच ठेऊया. थोड्या थोड्या वेळाने गोखले आत येऊन जात होते. त्यांना काहीतरी बोलायचे होते. तिसऱ्यांदा आल्यावर मात्र श्रीकांतनेच त्यांना थांबवले.

'गोखले बसा, काही बोलायचे आहे का?

‘माफ करा साहेब, बँकेच्या कामाचे नाही पण कालचे तुमचे ‘अनुग्रह’ बंगल्यात राहताहात हे ऐकून जरा काळजी वाटतेय’ चाचरत गोखले म्हणाले.

'‘गोखले साहेब, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही माझ्या काळजीपोटीच हे विचारताय हे मला कळतंय. पण खरोखर त्या बंगल्यात असे काहीही नाही. तुम्ही माझी बिलकुल चिंता करू नका’ असे श्रीकांतने सांगितले. ते ऐकून गोखले जरा आश्वस्त झाले.

‘साहेब, तसे काही नसलं तर चांगलच आहे, पण काही वाटलं तर मला लगेच कळवा, येतो मी’ असे म्हणत गोखले आपल्या कामाला गेले. त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा आत डोकावले नाही.

दिवसभराचे काम संपवल्यानंतर मात्र श्रीकांतच्या मनात कालच्या घटना पुन्हा तरळू लागल्या. पण विशेष म्हणजे त्यात त्याला काही चुकीचे वाटण्या ऐवजी कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले. नरवीर तानाजी चौकात त्याचे लक्ष कोकण-किनारा हॉटेल कडे गेले. त्याला पाहून काणेंनी हात हलवला. पण श्रीकांत आत न जाता तसाच वळून आपल्या रस्त्याला लागला. घरापाशी पोहोचताच आपल्या मनात त्याला एक अनामिक हुरहूर जाणवली. त्याने गाडी आत घेऊन स्टॅण्डवर लावली आणि कुलूप उघडून आत आला. अगदी आठवणीने त्याचे लक्ष किचनच्या दाराकडे गेले, तिथला पडदा हालत होताच. फारसा विचार न करता त्याने बेडरूम गाठले. ऑफिसचे कपडे बदलून तो फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये आला. अपेक्षेप्रमाणे तिथे धुऊन घडी करून ठेवलेला टॉवेल सोडून एकही कपडा नव्हता. फ्रेश होऊन तो हॉल मध्ये आला तर संकेत दिल्याप्रमाणे किचन मधून आवाज आला आणि चहाचा मंद दरवळ जाणवला. त्याने किचन मध्ये प्रवेश केला तर टेबलवर वाफाळता चहा आणि बिस्किटे ठेवलेली दिसली. मनातल्या मनात हसत त्याने चहा घेतला आणि बाहेर येऊन व्हरांड्यातल्या आराम खुर्चीवर बसला. त्याच्या व्हरांड्यातून बाहेरचा मुख्य रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता. गावाकडून दोन माणसे आणि एक स्त्री येत होते. त्यातील एकाच्या हातात सायकल होती, तिच्या कॅरियर वर काही गाठोडे बांधलेले होते. ती माणसे लांबूनच त्याच्या बंगल्याकडे पाहत पाहत येत होती. बंगल्याला यायला जिथे रस्ता वळतो तिथे ती येऊन थांबली आणि बंगल्याकडे बघत आपापसात बोलू लागली. आल्यापासून पहिल्यांदाच श्रीकांतला कुना माणसाची वर्दळ या भागात जाणवली होती. श्रीकांत पायऱ्या उतरून खाली आला. क्षणभर गेट जवळ उभा राहून त्यांच्याकडे बघू लागला. पण जसा तो गेट उघडून बाहेर रस्त्यावर आला तशी मात्र ती माणसे आणि स्त्रीही अगदी घाईने चालती झाली. श्रीकांतने त्यांना हातही केला पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती जवळ जवळ पळतच तिथून पुढे गेली. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवरची ती माणसे असावीत. श्रीकांत पुन्हा आत आला. थोडावेळ पुन्हा व्हरांड्यात बसला पण जरा अंधारून यायला लागल्यावर आत आला आणि सोफ्यावर बसत त्याने टीव्ही सुरु केला. आणि सहज त्याचे लक्ष सोफ्याच्या कडेला असलेल्या साईड टेबलवर गेले. तिथे त्याची आवडती ब्लेंडर्सची बाटली, ग्लास, पाण्याचा जग, खारे काजू आणि ग्रीन सॅलड ठेवलेले दिसले. ते बघून त्याचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले. जे काही चाललंय ते फारच चांगले चाललंय पण जे काही आहे ते अमानवी आहे हेही त्याला कळत होते. त्यामुळे कसे रियॅक्ट व्हावे हे त्याला ठरवता येत नव्हते. एकही रुपया खर्च न करता त्याला अगदी उत्कृष्ट सेवा घर बसल्या मिळत होती. आपण या मोहात अडकत चाललोय का? असा प्रश्न त्याला पडला.

शेवटी मोहाने विचारांवर विजय मिळवला आणि त्याने साईड टेबल समोर ओढला. एक पेग भरून घेत निवांत घोट घेत, बरोबरीला स्नॅक्स चाखत तो टीव्ही बघू लागला. नॉर्मल कंडिशनला हे म्हणजे ‘सुख म्हणजे यापेक्षा दुसरे काय असते’ असे म्हणावेसे वाटले असते पण या परिस्थितीत मात्र त्याचे मन बऱ्यावाईटाच्या सीमारेषेवर दोलायमान होत होतं. त्याचा हा राष्ट्रीय कार्यक्रम संपता संपता किचनकडून काही आवाज येऊ लागले. समोरचे टेबल बाजूला सारून तो उठला आणि हात धुऊन किचन मध्ये गेला. अपेक्षिल्या प्रमाणे टेबलवर ताट मांडून ठेवले होते. त्याने भांडी उघडून बघितली तर आज मात्र शुद्ध घरगुती बेत होता. वरण भात, पोळी, बटाट्याची भाजी हे पाहून त्याला अगदी घरच्यासारखं वाटले. आणि त्याला आपल्या आईची तीव्रतेने आठवण झाली. त्याने ताटात वाढून घेतले आणि पहिला घास घेणार तर तो सहज एक प्रयोग म्हणून मोकळ्या किचन कट्ट्याकडे बघत म्हणाला ‘तू पण बस ना जेवायला’ पण काही प्रतिसाद आला नाही. हातातील बांगड्यांची एक नाजूक किणकिण मात्र ऐकू आल्यासारखे त्याला वाटले. त्याने आजूबाजूला रोखून पाहिले पण इतर कुठेही काहीच हालचाल दिसत नव्हती. थोडावेळ वाट पाहून त्याने जेवायला सुरुवात केली. पहिला घास घेताच त्याला स्पष्टपणे आपल्या आईच्या हातच्या जेवणासारखीच चव लागली. ना जाणो का पण त्याचे डोळे थोडेसे ओले झाले. त्याने शांतपणे जेवण संपवले आणि हात धुवायला उठताने म्हणाला

‘आईच्या हातची चव चाखायला दिल्याबद्दल खूप खूप आभार. अन्नपूर्णा सुखी भव.’ पुन्हा एकदा तीच बांगड्यांची किणकिण ऐकायला आली पण बाकी काही हालचाल नव्हती. श्रीकांत बाहेर आला आणि हात धुऊन पुन्हा सोफ्यावर येऊन बसला. थोड्यावेळाने तो उठला आणि चप्पल घालत बाहेर निघाला. जाता जाता दरवाज्यात थांबून म्हणाला ‘येतेस फिरायला, जरा चक्कर मारून येंऊं’ काही प्रतिसाद मिळाला नाही.

बाहेर पडून तो रस्त्याला लागला. दरवाजा त्याने फक्त ओढून घेतला होता. पौर्णिमा जवळ आलेली असावी. बाहेर मस्तपैकी चांदणे पडलेले होते. दूरवर शहराच्या लाईट्स दिसत होत्या. डोंगराच्या बाजूलाही एक दिवा मिणमिणताना दिसत होता. जे काही घडतंय त्या घटनांचा विचार करत तो चांगला लांबपर्यंत चक्कर मारून आला. घरात येऊन त्याने साईड टेबलाकडे आणि नंतर किचनमध्ये नजर टाकली. सर्वकाही आवरून ठेवलेले दिसत होते. जाताने चालू असलेला टीव्ही ही बंद केलेला दिसत होता. त्याने मोकळ्या घरात नजर टाकत ‘गुड नाईट’ म्हटले आणि बेडरूम मध्ये आला. बेडवर त्याचे गरम पांघरून पायथ्याशी ठेवलेले होते, उशी जागेवर ठेवलेली होती. मनातल्या मनात पसंतीची पावती देत तो बेडवर लवंडला आणि काही क्षणातच अगदी गाढ झोपून गेला.

सकाळी श्रीकांत अगदी प्रसन्न मनाने उठला. कालच्यासारख्याच आजही सर्व गोष्टी जिथल्या तिथे हजर होत्या. एक अद्भुत, अनाकलनीय, अदृश्य शक्ती त्याची मन लावून सेवा करत होती. आंघोळ, नाश्ता करून तो बाहेर जाण्यासाठी तयार झाला. सॅक पाठीला लावत किचनकडे बघत म्हणाला ‘येतो मी’ अपेक्षेप्रमाणे पडद्याची सळसळ आणि बांगड्यांचा किणकिण आवाज आला. हसतच तो बाहेर पडला. बँकेत पोहोचून कामाला लागला कामाच्या गडबडीत दिवस कसा संपला हेही कळले नाही. परत येताने त्याचे लक्ष ‘हॉटेल कोकण किनारा’ कडे गेले. काउंटरवर हॉटेलमालक काणे बसलेले होतेच. आज मात्र श्रीकांत दिसताच त्यांनी आवर्जून त्याला हाक मारली. श्रीकांत नाईलाजाने थांबला. आत जाताना ‘आता यांना काय सांगायचे’ याचा मनाशी विचार करत होता.

‘या श्रीकांत साहेब, तुम्ही तर पहिल्या दिवसानंतर गायबच झालात’ काणे आदराने तक्रार करत म्हणाले.

‘तसे काही नाही काका, पण आमच्या बँकेतील शिपाई मला घरगुती जेवण आणून देतोय, त्यामुळे येणे जमले नाही’ श्रीकांतने आपल्या परीने थाप ठोकली.

’ मग चांगलंच झाले कि. पण चहा पाण्याला येत जावा कधी मधी’ असे म्हणत त्यांनी पोऱ्याला चहा आणायला सांगितले. काणेबुवांचा श्रीकांतशी गप्पा मारण्याचा मूड दिसत होता. पण श्रीकांत मात्र तेवढ्यास तेवढे बोलत होता. एकदाचा चहा आला आणि तो संपवून श्रीकांत उठला. काणेंनी आग्रह केला पण कामाचे निमित्त करून श्रीकांत तिथून सटकला.

एका आतुर ओढीने तो घरी पोहोचला. कुलूप उघडून आत येत त्याने किचनकडे नजर टाकली. पडद्याने नेहमीप्रमाणे सळसळत त्याच्या आल्याची दखल घेतली. तो आवरण्यासाठी बाथरूम कडे निघाला पण जाता जाता थबकून म्हणाला ‘माझा चहा झालाय हॉटेल मध्ये’ आवरून तो सोफ्यावर येऊन बसला. थोड्यावेळाने उठून बाहेरून एक लांब चक्कर टाकून आला. येईपर्यंत त्याचा सगळा सरंजाम तयार होता. सवयीचे झाल्यासारखे त्याने पेग भरला. आज तो आल्यापासून पडद्याकडे बघत काहींना काही बोलत होता. घरात आपल्याव्यतिरिक्त दिसत नसले तरी कोणीतरी आहे आणि ते आपले काळजी करणारे आहे हे त्याने मान्य करूनच टाकले होते. जेवण करून तो झोपला आणि सकाळी उठला. आवरून बाहेर पडताने त्याच्या हातात नेहमीच्या सॅक बरोबरच छोटी प्रवाशी बॅगही होती. ती घेऊन तो हॉल मध्ये आला आणि समोर कोणीतरी आहे असे समजूनच म्हणाला.

‘आज संध्याकाळी मी परत येणार नाही. दोन दिवसांसाठी पुण्याला जातोय. सोमवारी परत येईन’ असे म्हणून तो बाहेर पडणार तर कुणाचा तरी हुंदका ऐकू आला.

‘काळजी करू नकोस, नक्की येतो मी सोमवारी’ असे आश्वासन देत तो बाहेर पडला. पडद्याने नेहमीप्रमाणे सळसळ करून त्याला निरोप दिला.

बँकेत गेल्यावर त्याने शिपायाला पाठवून संध्याकाळच्या गाडीने पुण्याला जायचे बुकिंग करवून घेतले. काम संपवून निघताने गोखलेंना बोलावून ‘मी सोमवारी सुट्टीवर आहे. जरा पुण्याला घरी जाऊन येतो.’ असे सांगितले. मोटारसायकल बँकेच्याच आवारात लावून त्याने रिक्षाने एस.टी. स्टॅन्ड गाठले.

पहाटे पहाटे श्रीकांत घरी पोहोचला. त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला. एक आठवडाच झाला असला तरी खूप दिवसांनी आपला मुलगा घरी आलाय असेच लतिकाबाईंना आणि निळकंठरावांनाही वाटत होते. त्यांना खूप बोलायचे होते. पण श्रीकांत म्हणाला

‘रात्री गाडीत काही झोप झालेली नाही, मी जरा दोन तास पडतो. मग आपण छान गप्पा मारूयांत’

दोन तास म्हणत त्याने चांगले चार तास झोप काढली. उठल्यावर मात्र तो एकदम फ्रेश झाला होता. लतिकाबाईंच्या हातचे पोहे खात त्यांच्या गप्पा चाललेल्या होत्या.

'खाण्यापिण्याचे काय करतोस? हा प्रश्न आईने विचारताच त्याने ठरवून ठेवल्याप्रमाणे सांगितले.

‘अगं आमच्या बँकेच्या शिपायाची बायको खानावळ चालवते. तो रोज घरी डबा आणून देतो. चहापाणी मी स्वतःच घरी करतो’ यावर लतिकाबाई प्रेमळपणे हसत म्हणाल्या.

‘तू आणि चहा घरी करतोस? इथे होतास तेंव्हा कधी पाण्याचा ग्लास पण भरून घेतला नाहीस’

श्रीकांतने हसून सोडून दिले.

‘मी सँट्रो घेऊन जाणार आहे, जरा बघून येतो’ असे म्हणत श्रीकांत बाहेर पडला. आईबाबांशी बोलत होता तोपर्यंत त्याचे मन रमले होते पण जसा बाहेर पडला तशा त्याला भरतपूरच्या बंगल्यातील घटना आठवायला लागल्या. तो आवाज, पडद्याची सळसळ, बांगड्यांचे किणकिणने, तो मोगऱ्याचा सुगंध त्याला खुणावू लागला. दुपारी आईच्या हातचे छान जेवण करून तो पुन्हा झोपला. पण डोळ्यापुढून बंगला काही जात नव्हता. त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार तो खरेतर सोमवारी परत जायला निघणार होता, त्याने बँकेत रजाही टाकली होती. पण आता मात्र त्याला कधी एकदा परत जातो असे झाले. शरीराने तो पुण्यात होता खरा पण मन मात्र भरतपूरमध्येच रेंगाळत होते. संध्याकाळ होईतो तो एका ठाम निर्णयाप्रत आला. रात्रीचे जेवण चालू असताने श्रीकांतने विषय काढला.

'‘बाबा, मी उद्याच निघतोय’

'‘अरे तू तर म्हणालास ना सोमवारी जाणार म्हणून हे काय अचानक. आलास तर राहा दोन दिवस’ लतिकाबाई म्हणाल्या.

‘हो रे मीही तेच म्हणतोय, जा ना सोमवारी’ निळकंठरावांनीही लतिकाबाईंच्या सुरात सूर मिसळला.

‘हो मी म्हणालो होतो पण दुपारी मला आठवले कि हेडऑफीसचे काही लोक मंगळवारी माझ्या ब्रँचला भेट द्यायला येणार आहेत. त्यासाठी मला जरा तयारी करायला पाहिजे. अजून सगळे समजावून घ्यायला वेळच मिळाला नाही’ श्रीकांतने सांगितले.

‘पण राहिला असतास उद्याच्या दिवस तर आम्हाला बरे वाटले असते’ लतिकाबाईंनी जरा नाराजीनेच म्हटले.

‘अगं आई, मी १५ दिवसांनी परत येईल ना, पण उद्या जाणे महत्वाचे आहे प्लिज’ श्रीकांतने आईची समजूत घालायचा प्रयत्न केला.

'जाऊ दे ग त्याला, नवीनच रुजू झालाय, कामाचा व्याप असेल. बरं कधी निघणारा आहेस? निळकंठरावांनी विचारले.

‘सकाळी लवकरच निघेन, गाडी घेऊन जातोय आणि घाट रस्ते आहेत, लवकर पोहोचलेले बरं’ श्रीकांत म्हणाला.

लतिकाबाईंना काही हा निर्णय पसंत नव्हता पण श्रीकांतचा स्वभाव त्यांना माहित होता. एकदा त्याने ठरवले म्हणजे त्यात काही बदल होणार नाही. जेवणे होताच त्यांनी टेबल आवरायला मावशींना हाक मारली. आपण आईबाबांना नाराज करतोय हे श्रीकांतला कळत होते पण भरतपूरची ओढ त्याला असे करायला भाग पाडत होती.

श्रीकांतला स्वस्थ झोप अशी लागलीच नाही. पहाटे पहाटे त्याला जाग आली. घड्याळाकडे लक्ष टाकत त्याने अंगावरचे पांघरून झुगारून दिले आणि बाथरूम गाठले. त्याच्या आवाजाने लतिकाबाईंनाही जाग आली. त्यांनी श्रीकांतला आवाज देत 'खायला काही करू का? म्हणून विचारले. बाथरूममधूनच श्रीकांत म्हणाला

‘आई, इतक्या सकाळी खाणे होणार नाही, मी रस्त्यात खाईन काहीतरी. चहा कर फक्त’

आंघोळ उरकून श्रीकांत किचनमध्ये आला. आईला मिठी मारत म्हणाला ‘नाराज होऊ नकोस गं, लवकरच परत येतो मी.’ त्याने आईची नाराजी दूर करायचा प्रयत्न केला.

‘बरं बरं आता मस्का नको मारू. चहा घे. तुझे सगळे कपडे वैगरे घेतलेस का बघ’ लतिकाबाई म्हणाल्या.

चहा संपवून श्रीकांतने बॅग बाहेर आणली. तोपर्यंत निकंठराव सुद्धा जागे होऊन बाहेर आलेले होते. आईने तेवढ्यात रव्याच्या लाडूचा एक डबा श्रीकांतच्या बॅगेत टाकला. रात्री जागून त्यांनी लाडू केले होते. आईबाबांना नमस्कार करून श्रीकांतने गाडी बाहेर काढली तेंव्हा पूर्वेकडे पहाटेची आभा दिसत होती. रस्त्यावरचे लाईट अजून चालूच होते. कात्रज घाटात पोहोचेतो सूर्योदय झाला होता.

एवढ्या सकाळी निघाल्याचा श्रीकांतला चांगलाच फायदा झाला. वातावरण अतिशय सुंदर होतं. ट्रॅफिकही नव्हतं एखाद्या कॉलेजकुमाराप्रमाणे मस्त गुणगुणत श्रीकांत गाडी पळवत होता. सातारा सोडल्यावर हायवेवरच्या एका हॉटेलवर त्याने नाश्ता केला आणि पुन्हा प्रवास सुरु झाला. एस.टी. ला जरी आठ-नऊ तास लागत असले तरी स्वतःच्या गाडीने तो सहा तासातच रत्नागिरीला पोहोचला. जेवणाला अजून उशीर आहे असे मनाशी म्हणत तो भरतपूर कडे निघाला. जसजसे भरतपूर जवळ येत होते तसतशी त्याच्या मनातील ओढ वाढत होती. हे आपल्याला काय झालंय? एका आत्म्याच्या भेटीसाठी का आपण एवढे उतावीळ कसे झालोय? हे चुकीचे आहे हेही त्याला जाणवत होते पण मन मात्र उंचावरून पडणाऱ्या धबधब्याच्या पाण्याच्या वेगाने बंगल्याकडे धावत होते.

शहरात कुठेही न थांबता श्रीकांत घरी पोहोचला. गाडी बाहेर थांबवून त्याने हॉर्न वाजवला, जसे काही कोणी गेट उघडायला येणार होते. मग स्वतःच उतरून त्याने गेट उघडले. गाडीत बसताने त्याचे लक्ष हॉलच्या खिडकीकडे गेले. तिथला पडदा कोणीतरी हातात धरून बाहेर बघतय असा दिसत होता. श्रीकांतचे लक्ष जाताच पडदा पुन्हा जागेवर आला. मनामध्ये हसत त्याने गाडी आत घेतली. बॅग काढून घेऊन कुलूप उघडत तो आत आला. घरात अगदी प्रसन्न वातावरण वाटत होतं. मोगऱ्याचा सुंगंध दरवळत होता. आणि त्याच बरोबर खमंग नॉनव्हेज जेवणाचा सुगंधही दरवळत होता. श्रीकांतने बॅग सोफ्यावर टाकली आणि तो किचनमध्ये गेला. किचनमध्ये अर्थातच कोणी दिसले नाही. पण डायनिंग टेबलवर साग्रसंगीत जेवण तयार होते. त्याने आजूबाजूला बघत विचारले

''कोण आहेस तू? हा स्वयंपाक कोणी केलाय? प्रतिसादाबद्दल बांगड्यांची किणकिण तेवढी ऐकू आली. कोणीच काही बोलत नाही असे बघून श्रीकांत रागाने बाहेर पडला.

‘मला तुझ्या हातचे जेवायचे नाही’ असे म्हणत बॅग उचलून तो बेडरूम मध्ये गेला. प्रवासातील कपडे बदलून तो बाथरूम मध्ये गेला. हातपाय धुताने मात्र त्याचे विचारचक्र चालू झाले. आपण खरेतर आज न येता उद्या येणार होतो. पण अचानक येऊनही ‘तिला’ आपण येणार हे तर कळलेले होतेच. पण आपण जेवायलाच येणार आहोत हेही कळले होते. आज रविवार म्हणून खास नॉनव्हेज जेवण सुद्धा तयार ठेवलेय. पुण्यात सुद्धा रविवारी त्यांच्याकडे मटण असायचे. बाकीचे सर्व राधा मावशींनी केलेले असले तरी मटण मात्र श्रीकांतच्या आई लतिकाबाई स्वतः करायच्या. बाहेर मघाशी येताने त्याला जो जेवनाचा सुगंध आला होता तोही अगदी घरच्यासारखाच होता.

‘कोण आहे ही बाई?’ आत्मा असूनही ती आपल्याशी एवढ्या आपुलकीने का वागतेय?

हातपाय धुऊन झाल्यावर श्रीकांत सोफ्यावर येऊन बसला. किचनच्या पडद्याआड कोणीतरी उभे असल्यासारखा तो पडदा हालचाल करत होता. मधेच पडदा बाजूला सरकवून कोणीतरी बाहेर आल्या सारखे वाटत होते, पुन्हा आत गेल्यासारखे वाटत होते. ‘तिचि’ घालमेल त्याला अस्वस्थ करत होती पण तरीही तो हट्टाने तसाच बसून राहिला. अखेर स्वयंपाक घरातुन आवाज आला ‘चला ना जेवायला’ यावेळी काहीही गडबड नाही, अगदी सुस्पष्ट गोड, थोडासा आर्जवी आवाज होता. श्रीकांतने चमकून किचनकडे बघितले. पडदा अगदी कोणी हातात धरून ठेवल्यासारखा एका बाजूला कललेला होता. प्रत्यक्ष कोणी दिसत नाही एवढे सोडले तर ‘तिचा’ अगदी सहजपणे घरभर वावर होत होता.

'‘हे बघ, तू कोण आहेस हे कळल्याशिवाय मी जेवणार नाही’ श्रीकांत म्हणाला आणि काय प्रतिक्रिया होतेय हे बघू लागला. पण बांगड्यांची नाजूक सळसळ सोडली तर बाकी सर्व शांत होतं. हे बघून श्रीकांत उठला आणि निर्धाराने म्हणाला

‘ठीक आहे, मग मी दुसरीकडे राहायला जातो आजपासून’ असे म्हणून तो बेडरूमकडे जायला निघणार तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा बंद झाला. आणि मघाचाच आर्त आवाज पुन्हा आला.

‘नका ना जाऊ, अनेक वर्षांनी कोणाची तरी सोबत लाभलीय’

‘तू कोण आहेस हे समजल्याशिवाय मी इथे थांबणार नाही’ श्रीकांतने पुन्हा ठामपणे सांगितले. काही वेळाने आवाज आला,

‘मी अनुराधा’

'कोण अनुराधा? श्रीकांतने सावरून बसत विचारले.

‘अनुराधा, या बंगल्याची मालकिन’

‘पण माझ्या माहितीप्रमाणे इथल्या मालक-मालकिणीने आत्महत्या केली होतीं’

'तिच मी दुर्दैवी अनु. माझ्या नेभळट नवऱ्याने आत्महत्या केली असेल पण माझी इच्छा नसताने मलाही त्याने आपल्यासोबत नेलं, म्हणजे माझा खुनच झाला नां?..ती अगदी पोटतिडीकेने म्हणाली

'मला सर्व काही सांग. काय झाले होते? तू या अवस्थेत इथे कशी?.. श्रीकांत सोफ्यावर बसत म्हणाला.

‘सर्व सांगते, ती एक मोठी कहाणी आहे, पण अगोदर जेवून घ्या, मग निवांत बोलू’ तिने आर्जवाने म्हटले. अधिक ताणून न धरता श्रीकांत आत आला, टेबलवर बसला. तो पुढे होऊन पातेले उचलणार तेवढ्यात त्या पातेल्यावरचे झाकण आपॊआप उघडले. आतली वाफ बाहेर आली. एक डाव आपोआप हलला आणि त्याने श्रीकांतच्या ताटात भाजी वाढली. अशाच प्रकारे सर्व पदार्थ ताटात वाढले गेले. वस्तूंच्या हलण्यावरून श्रीकांतने अंदाज केला कि आपली डाव्या बाजूला टेबलासमोर कोणीतरी उभे आहे. तीच हे सर्व करत होती पण दिसत मात्र नव्हती. श्रीकांतने तिकडे बघत म्हटले

‘तू ही बस ना जेवायला’ अंधारातून नुसताच एक दुखरा हुंकार आला आणि पाठीमागून शब्द आले

'‘आमच्या नशिबात आता हे काहीच नाही, ती माझी गरज कधीच संपली’ ती म्हणाली. मग श्रीकांतने जेवायला सुरुवात केली. तोंडात पहिला घास घेतल्याबरोबर त्याला आईच्या हातची चव जाणवली.

'वा! मस्त, अगदी आईने केलेलं वाटतंय. तुला हे कसे जमते? श्रीकांतने विचारले.

‘मला अजूनही बरंच काही जमतं, तुम्ही जेवा मग मी सगळं सांगते’ मग मात्र श्रीकांत न बोलता जेऊ लागला. त्याला कडकडून भूक लागली होती. आणि जेवणही अतिशय रुचकर होते. जेवण संपवून तो बाहेर आला. भरपेट जेवण त्याच्या अगदी अंगावर आले होते. तिची कहाणी ऐकायची या उत्सुकतेने तो सोफ्यावर बसला खरा, पण थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला आणि त्या सोफ्यावरच तो आडवा झाला आणि काही क्षणातच गाढ झोपून गेला.

श्रीकांतला जाग आली तेंव्हा बाहेर अगदी अंधारून आले होते. तो धडपडून उठून बसला आणि इकडेतिकडे बघू लागला. हवेतून आवाज आला ‘मी इथेच आहे’

‘फसवलास ना मला, तुझी कहाणी सांगण्याऐवजी मला झोपवून टाकलंस’ श्रीकांत खोट्या रागाने म्हणाला.

‘मी नाही फसवले, तुम्हाला तुमच्या झोपेने फसवले’ हसत ती म्हणाली. मग श्रीकांतच्या लक्षात आले. काल इकडे यायचे या ओढीने रात्रभर चांगली झोप आली नाही. पहाटेही तो लवकरच उठला होता. नंतर एवढा दूर अंतर ड्रायव्हिंग करत आल्यामुळे थकलेले शरीर आणि वरून पोटभर छान जेवण यामुळे तो गाढ झोपून गेला होता. मनात तोच ओशाळला. ‘बरं चल, माझीच चूक होती. सांग आता काय घडले ते’ श्रीकांत सोफयावर मांडी घालून बसत म्हणाला.

‘अहो एवढी काय घाई आहे, तुम्ही तोंड धुऊन फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी चहा करते, तो घ्या, आणि मग सांगते’ ती म्हणाली. श्रीकांतला खूप गम्मत वाटली. च्यायला ही अगदी आपली बायको असल्यासारखी आपल्यावर हक्क गाजवतेय आणि मनापासून आपली सेवाही करतेय. शिवाय सगळं काहीं जागेवर मिळतंय आणि तेही फुकट. चांगला संसार आहे आपला. पण संसाराचा विचार डोक्यात येताच मात्र तो चमकला. काय विचार करतोय आपण? एका आत्म्याबरोबर संसाराची स्वप्ने? नाही, आपण यात फार गुंतायचं नाही. आपण फक्त तिची कहाणी ऐकून घेऊ. मग बघू पुढे काय करायचे ते. असे मनाशी म्हणत तो बाथरुमकडे गेला. घाईघाईत आवरून बाहेर आला. किचनमधून चहाचा सुगंध येत होता. किचनमध्ये जाण्याऐवजी तो मुद्दाम सोफ्यावरच बसला. आणि पुढे काय घडतेय हे पाहू लागला. पडदा हलला आणि काही क्षणात त्याच्या समोरच्या टीपॉयवर चहाचा ट्रे, बाजूला खायला बिस्किटे असा सरंजाम समोर आला. त्याने एकदा स्पर्श करून खरेपणाची खात्री करून घेतले.

‘मजा आहे एका माणसाची’ असे म्हणत त्याने चहाचा कप तोंडाला लावला. शेजारच्याच सोफ्यावरून खुद्कन हसल्याचा आवाज आला. त्याने चहा संपवला. पोट भरलेले असल्याने बिस्किटे काही खाल्ली नाहीत. कप खाली ठेवत तो शेजारच्या सोफ्याकडे पाहत म्हणाला,

‘आता बाकी काहीही बहाणा नाही. तू मला सांग तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते’

थोडावेळ तशीच शांतता राहिली, सोफ्याची हालचाल झाली आणि तिचे शब्द कानी आले.

'मी अनुराधा दळवी. अनाथाश्रमात वाढले. त्यामुळे आईबापांचे, कुटुंबाचे सुख कधी अनुभवलेच नाही. तसा हा आश्रम हेच एक मोठे कुटुंब आहे. अनघा ताई आणि जनार्दन दादा दळवी हा अनाथाश्रम चालवतात. आम्ही सर्व त्यांना दादा आणि वहिनी म्हणत असू. या कुटुंबामुळेच मला आडनाव मिळाले. याच आश्रमात राजाराम सुद्धा होता. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा. अतिशय लाजाळू, शामळू, अबोल. राजाराम माझ्याकडे अनेकदा चोरून बघत असतो हे मला माहित होते. पण माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराचा एकही गुण या राजाराम मध्ये नव्हता. त्यामुळे मी त्याला कधी भाव दिला नाही. आश्रमात राहून आम्हाला बाहेर शालेय शिक्षणही मिळायचे. बारावीनंतर राजाराम डी.एड. ला गेला. मलाही बारावीला चांगले मार्क मिळाले आणि दादा वहिनीच्या सांगण्यावरून मीही डी.एड.ला ऍडमिशन घेतले. मी प्रवेश घेतला तेंव्हाच राजारामचे डी.एड. पूर्ण झाले होते. आणि त्याच्या नशिबाने त्याला जिल्हा परिषद शाळेत नोकरीही लागली. आश्रमाच्या नियमानुसार त्याला आश्रम सोडावा लागला. तिथून जवळच असलेल्या केंजळ गावी त्याने एक खोली भाड्याने घेतली आणि तो तिथे राहू लागला.

आश्रम सोडून गेला असला तरी त्याची दर रविवारची आश्रमाला भेट कधी चुकली नाही. त्याचा येण्याचा उद्देश मला भेटणे हाच असायचा. दादा आणि वहिनींचा तो लाडका होता त्यामुळे ते त्याला काही बोलायचे नाहीत. मी मात्र तो येण्याच्या वेळी मुद्दाम कुठेतरी निघून जायची किंवा अभ्यासाचे निमित्त करून त्याच्यापासून दूर राहायची. आणि एकदा त्याने मला न विचारता दादा-वहिनींकडे मला लग्नासाठी मागणी घातली. त्यांनाही आनंद झाला. आपल्या आश्रमात वाढलेले दोन जीव एकत्र सुखाने नांदणार असतील तर त्यांना हवेच होते. दादांनी मला बोलावून घेतले आणि राजाराम बद्दल विचारले. तोपर्यंत मी लग्नाचा काही विचार केलाच नव्हता. मला बोलावून घेऊन दादा म्हणाले.

‘हे बघ अनुराधा, पूढील वर्षी तुझे शिक्षण संपले कि नियमानुसार तुला आश्रम सोडावा लागेल. तू एकटी मुलगी कोठे राहणार? राजाराम तसा चांगला मुलगा आहे. त्याला नोकरीही आहे. तुम्ही दोघेही आमचे लाडके आहात. त्यामुळे दोघे जर एकत्र आलात तर मला आणि अनघाला खूप आनंद होईल’.

त्यांच्या या बोलण्याने मला जमिनीवर आणले. आपल्यासारख्या अनाथ मुलीला कोण राजकुमार भेटणार? भविष्याचा विचार आणि दादा-वहिनींचा आग्रह यामुळे मी इच्छा नसताना लग्नाला तयार झाले. पुढच्याच आठवड्यात आश्रमातच छोट्या समारंभात आमचे लग्न झाले. आश्रम सोडताने नाही म्हटले तरी खूप वाईट वाटले. वहिनींच्या गळ्यात पडून मी खूप रडले.

राजारामने त्याच्या नोकरीच्या गावातच दोन खोल्यांची एक जागा भाड्याने बघितली होती. दादा-वहिंनींनी आम्हाला लग्नाचा आहेर म्हणून संसार उपयोगी वस्तू दिल्या होत्या. आमचा संसार सुरु झाला. मला अजून नोकरी लागली नव्हती. आणि एकेदिवशी आश्रमातून आम्हाला दोघांनाही बोलावणे आले. आम्ही रविवार गाठून आश्रमात गेलो. दादा-वहिनींनी आमचे खूप आनंदाने स्वागत केले. वहिनींनी माझ्या अंगावरून मीठ-मोहऱ्या ओवाळून टाकून माझी दृष्ट काढली. ‘पायगुणांची गं बाय माझी’ असे म्हणत मला जवळ घेतले. आमची चौकशी करून झाल्यावर दादांनी बोलायला सुरुवात केली.

‘‘आश्रमाला एक मोठी देणगी मिळतेय तब्बल एक कोटी रुपयांची’ पण देणगीदाराच्या दोन अटी आहेत. एक म्हणजे यातील ५० लाख रक्कम राजारामच्या नावावर करायची आणि दुसरी म्हणजे हि देणगी कोणी दिलीय हे शोधायचा प्रयत्न करायचा नाही’… एवढे बोलून दादा आमची प्रतिक्रिया बघत थांबले. राजारामला एवढी रक्कम आपल्याला मिळणार हे ऐकून हर्षवायू झाला. माझ्या मनात मात्र पहिला हा विचार आला कि हि देणगी कोणी दिली असेल? नक्कीच हि देणगी देणारे राजारामचे वडील किंवा आई असणार. आईच बहुतेक. आपल्या अनौरस मुलाला आश्रमात सोडून दिले असेल आणि आता आपल्या पापाची उतराई म्हणून हि देणगी देण्याचा प्रयत्न असेल. मला हा कुणाचा फुकटचा पैसा नको होता. पण राजाराम मात्र हुरळून गेला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो आनंद लपत नव्हता. माझी नाराजी बघून दादा म्हणाले ''काय गं अनु, तुला हे पसंत नाही का?

‘हो दादा, देणगीदारांची चौकशी करायची नाही अशी अट असली तर ही देणगी कुठल्या भावनेने दिली जातेय हे स्पष्ट दिसतंय. असा पैसा आम्हाला नको.’ यावर दादा काही बोलायच्या आताच राजारामच रागाने माझ्याकडं बघत म्हणाला.

‘हे काय अनु, अशी लक्ष्मी हाती येतेय तिला तू नाही म्हणतेस? अगं आपली सगळी स्वप्न पूर्ण करता येतील एवढ्या पैशात.’ त्याची नाराजी त्याच्या आवाजातून दिसत होती. यावर दादाच म्हणाले.

‘अनु, तुझ्या भावना मला कळतात. पण पैसे कोण देतंय यापेक्षा त्याचा वापर कसा होणार हे तू बघ ना. या पैशातून तुमचेही भले होईल आणि आश्रमासाठी अजून एक इमारत बांधता येईल. आम्हाला स्वतःसाठी काहीही नकोय पण तुमच्यासारखी अजून किती मुले आम्ही सांभाळू शकू याचा विचार कर ना’

त्यांचे मला पटले त्यामुळे मी होकार भरला. राजारामचा तर प्रश्नच नव्हता. दादा-वहिनींनी आम्हाला निरोप दिला.

आठच दिवसात राजारामच्या खात्यात ५० लाख जमा झाले. पैसे आल्यापासून राजारामला काय करू आणि काय नको असे झाले होते. मी मग त्याला जमिनीवर आणले. आपण या पैशातून एखादे घर बांधूया असे सांगितले. माझी ही कल्पना त्यालाही आवडली. जन्मापासून अनाथाश्रमात राहिल्यामुळे स्वतःचे घर असणे हे आमच्या दोघांच्या दृष्टीने किती मोठे स्वप्न होते याची कोणाला कल्पना येणार नाही.

आता आपण आहोत तो प्लॉट राजारामने १० लाखात खरेदी केला. कोना एका बिल्डरने हे प्लॉट पाडले होते. प्लॉट घेताने मी शहरापासून फार दूर आहे म्हणून विरोध केला होता. पण राजाराम जरासा एकलकोंडाच होता. त्यामुळे त्याला आपले घर गोंगाटापासून दूर हवे होते. प्लॉट घेतल्यानंतर मात्र सर्व गोष्टी मी ताब्यात घेतल्या. मला एक चांगला उद्योग मिळाला होता. एक आर्किटेक्ट शोधून प्लॅन तयार करून घेतला आणि त्यांच्याच ओळखीने एका काँट्रॅक्टरला काम सुद्धा दिले. यात राजारामचा सहभाग अतिशय कमी होता. काही महिन्यापूर्वीच आम्ही केंजळ येथील खोली सोडून शहरात राहायला आलो होतो. राजारामने मोटारसायकल घेतली होती त्यामुळे त्याला शाळेवर जाता येत होते.

हे घर कामगारांनी जरी बांधले असले तरी त्यातील विट अन विट माझ्या डोळ्याखालून गेलीय. माझा दिवसातला बहुतांशी वेळ इथेच जायचा. पैशाची चिंता नसल्याने अगदी सहाच महिन्यात आमचे हे घर तयार झाले. मग घर सजवण्यासाठी एकेक वस्तू घ्यायला सुरुवात केली. राजारामला मी किती वेळा माझ्या बरोबर यायचा आग्रह केला पण त्याने मात्र कामाचे निमित्त काढून कायम टाळाटाळ केली. त्यामुळे या बंगल्यातील चमचापासून तर सोफ्यापर्यंत प्रत्येक वस्तू माझ्या पसंतीची आहे. आणि यामुळेच या बंगल्याबद्दल माझ्या भावना फार तीव्र आहेत. खऱ्या अर्थाने हे ‘माझे घर’ आहे. लग्न होऊन तीन वर्षे होऊनही आम्हाला मुल झाले नव्हते ही रुखरुख सुद्धा या घरामुळे मनातून कमी झाली.

आमचे घर बांधून तयार झाले तरी आजूबाजूला कोणीच बांधकामाला सुरुवात केली नव्हती. एकट्याच कुटुंबाने एवढ्या गावा बाहेर राहायचे हा मुद्दा होता. पण राजारामला एकांत आवडत होता आणि मला या घराबद्दल इतकी आपुलकी निर्माण झाली होती कि कधी एकदा राहायला जातोय असे मला झाले होते. आमचे दोघांचेही तसे कोणी नातेवाईक नव्हते आणि दादा-वाहिनी त्यावेळी नेमके महिनाभर कुठल्या तीर्थयात्रेला गेले होते. मला एवढे दिवस धीर धरवत नव्हता. मग गावातले एक गुरुजी बोलावून आम्ही दोघांनीच घरात एक छोटी पूजा घातली. आणि एकमेकांच्या साक्षीने गृहप्रवेश केला. लवकरच मलाही इथे भरतपूर मधेच एका खाजगी शाळेत नोकरी मिळाली. राजाराम आणि मी सकाळी साडेआठला बाहेर पडायचे. तो मला शहरात सोडून पुढे त्याच्या शाळेला जायचा. नर्सरी असल्याने बाराला माझी शाळा सुटायची आणि मी साडेबारापर्यंत घरी यायची. घरात आले कि मला एकदम प्रसन्न वाटायचे. घराची बागेची निगा राखणे हे माझे आवडते काम. बागेत एखादे वाळलेले पान किंवा घरात धुळीचा एक कनसुद्धा कधी दिसू द्यायची नाही मी. संध्याकाळी साडेपाचला राजाराम यायचा. तो आला तरी आमच्यात बोलणे असे फार व्हायचे नाहीच. पसंत नसताने केलेले लग्न आणि तीन वर्ष होऊनही मुलं न होणे ही खंत कधीमधी डोके वर काढायचीच. माझ्या दृष्टीने राजाराम हा त्या घरातला पेइंग गेस्ट होता, आणि ते संपूर्ण घर माझं, ‘फक्त माझं’ होतं. राजारामच्या बाबतीत नाराजी असली तरी बाकी सर्व खूप छान चालले होते. आमच्या शाळेतही माझा वेळ चांगला जायचा आणि घरातही मजेत जायचा. या घरात आल्यानंतर मला कधीही एकटेपण जाणवले नाही. घरातल्या प्रत्येक वस्तूशी मी बोलायची, त्यांची काळजी घ्यायची. एखादा कप चुकून फुटला तरी मला गलबलून यायचं. माझ्या परीने तरी खूप सुखात दिवस जात होते माझे.

आणि या सुखाला एकदा नजर लागली. मी लहानपणापासून तशी देखणीच आहे. आश्रमात राहिल्यामुळे मला तशी बाह्य जगाची झळ कधी बसली नाही पण आता मात्र हे जाणवायला लागले. शाळेतील अनेक शिक्षक अगदी वयस्कर सुद्धा मुद्दामहून माझ्याकडे कटाक्ष टाकायचे, बोलायचा प्रयत्न करायचे. पण मी कधीच मर्यादा ओलांडली नाही. सगळ्यांशी हसून खेळून पण मर्यादा सांभाळून मी वागायचे. हे सर्व मी ग्राह्य धरलेलेच होते पण शाळेतून बाहेर पडून घराकडे येताने एक नवीनच त्रास सुरु झाला होता. नरवीर तानाजी चौकातच चार-पाच तरुणांचे टोळके बसलेले असायचे. मी येताने दिसले कि त्यांचे अचकट विचकट बोलणे सुरु व्हायचे. कधी कधी मी रागावून त्यांच्याकडे बघायची किंवा आजूबाजूच्या लोकांकडे मदतीच्या अपेक्षेने बघायची पण ते तरुण गावावर ओवाळून टाकलेलेच होते. त्यांच्या नादाला कोणी लागायचे नाही.

हळूहळू त्यांची मजल वाढत गेली. माझ्या मागोमाग ते यायला लागले. तसा हा भाग निर्जनच. रहदारी अशी नव्हतीच. त्यामुळे मी भीत भीत कशीतरी घरी यायचे आणि घरत येऊन दरवाजाला आतून कुलूप लावून घ्यायचे. एका संध्याकाळी मी राजारामला हे सांगितले पण त्याने उलट मलाच लेक्चर देत त्यांच्या नादी लागू नको म्हणून सांगितले. मला राजारामचा प्रचंड राग आला. दुसऱ्या दिवसापासून मला शाळेवर जायचे म्हणजे शिक्षा वाटायला लागली. एकेदिवशी राजाराम आणि मी जात असताने त्या टवाळखोरांनी घाणेरड्या कमेंट केल्या. आतातरी राजाराम त्यांना काहीतरी जाब विचारेल असे वाटले. पण त्या मुलांकडे दुर्लक्ष करून तो सरळ मला सोडून निघून गेला. राजारामच्या या कचखाऊ वृत्तीमुळे त्या मुलांचे अजूनच धाडस वाढले. त्या दुपारी ती मुले माझ्या मागोमाग आली. एरव्ही मी आतल्या रस्त्याला वळले कि ते निघून जायचे पण आज मात्र ते बंगल्यापर्यंत आले. मी पटकन गेट उघडून आत गेले आणि घरात जाऊन दरवाजा बंद करून घेतला. माझा जीव कितीतरी वेळ धडधडत होता. संध्याकाळी राजाराम आल्यावर मी त्याला आजचा प्रसंग सांगितला. पण त्याने अगतिकपणे मलाच विचारले ‘आपण यावर काय करू शकतो, सहन करायचे’

''आपण पोलिसांकडे तक्रार केली तर? मी पर्याय सुचवला. पण पोलिसांचे नाव ऐकून त्या गुंडांच्या अगोदर राजारामच घाबरला. मी रागावून त्याच्याशी बोलणे टाकले.

दोन दिवसानंतर नेहमीप्रमाणे मी आणि राजाराम गाडीवरून जात होतो. आम्ही येताने पाहून ती मुलं मुद्दामहून रस्त्यात येऊन थांबली. राजारामला गाडी काढता येत नव्हती. त्याने हॉर्न वाजवत कडेने गाडी घेण्याचा प्रयत्न केला. त्या मुलांपैकी एकजण मुद्दाम गाडीच्या जवळ आला आणि गाडीचा धक्का लागताच त्याने गाडीचे हॅण्डल पकडले. राजाराम त्यांना सॉरी म्हणाला. पण त्या गुंडाने राजारामची कॉलर पकडली. आणि अर्वाच्य भाषेत आम्हाला शिव्या देत राजारामच्या तोंडात मारली. मी उतरून त्यांची विनवणी केली. 'दादा का आम्हाला त्रास देताय? आम्ही काय नुकसान केलाय तुमचे? असे आर्जवाने म्हणाले.

त्यावर फिदीफिदी हसत त्यातला एकजण म्हणाला ‘ये रघ्या तुला दादा म्हणतीय बघ’ आपण नाही असे ऐकून घेणार, आपली डार्लिंग आहे ती’

मला मेल्याहून मेल्यासारखे होत होते. राजारामची तर बोबडीच वळली होती. तो फक्त सॉरी सॉरी एवढेच म्हणत होता. आजूबाजूला लोक गोळा व्हायला लागल्यावर मात्र त्या गुंडाने राजारामला ढकलून दिले आणि ‘रस्त्याने नीट गाडी चालवत जा, आज सोडतोय तुला’ असे म्हणत सोडून दिले. राजाराम गाडीवरून पडता पडता वाचला. जमलेल्या लोकांनी उलट आम्हालाच 'कशाला त्या गुंडाच्या नादी लागताय? म्हणून तत्वज्ञान शिकवले. राजाराम निघून गेला आणि मीही शाळेत गेले.

साडेबाराला घरी येताने मला धास्तीच पडली होती कि आता हे टवाळखोर काय करणार? पण सुदैवाने चौकात त्यांच्यापैकी कोणीही नव्हते. मी रस्त्याने येताने हाच विचार केला कि उद्या काहीही झाले तरी राजारामला घेऊन पोलीस स्टेशनला जायचे आणि या गुंडांविरुद्ध तक्रार करायची. हा निर्णय घेतल्यानंतर मात्र मन जरा स्थिर झाले. संध्याकाळी राजाराम आला पण त्याचा चेहरा अतिशय पडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरून तो किती खचलाय हे दिसत होते. मी त्याला चहा-पाणी दिले. आणि नंतर त्याला म्हणाले.

‘हे बघ राजाराम, आता पाणी डोक्याच्यावर जायला लागलंय. आपण या गुंडांची तक्रार पोलीसांकडे करू’

‘नको ग, ते फारच भयानक आहेत. आपले काय करून टाकतील याचीच मला भीती वाटतेय’ त्याचा हा दुबळा स्वभाव मला अत्यंत चीड आणत होता. माझाही तोल सुटला आणि मीही त्याला लागेल असे बोलले. पण याचा परिणाम म्हणून राजाराम म्हणाला ‘ठीक आहे, उद्या जाऊया आपण पोलिसांकडे.’ आता स्वयंपाक कर मला भूक लागलीय, आणि मी हे आईस्क्रीम आणलेय ते फ्रिजमध्ये ठेव.’

आज पाहिल्यान्दाच राजारामने स्वतःहून काहीतरी आणले होते. मला फार आश्चर्य वाटले. पण कदाचित सकाळच्या प्रसंगाने सैरभैर झाल्याने आणले असेल असे मी समजले. मी ते आईस्क्रीमचे कोण डीप फ्रिजमध्ये ठेवले आणि स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवण केले. जेवताने मी पुन्हा बजावून राजारामला सांगितले कि उद्या आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे आहे. तोही ‘हो नक्की जाऊ’ म्हणाला. जेवण झाल्यावर मी आईस्क्रीम चे कोण आणले. खरेतर मला आईस्क्रीम नको होते पण राजारामने एवढे आणलेय तर त्याला नाराज करायला नको म्हणून मी आईस्क्रीम खायला लागले. आईस्क्रीमची चव जरा कडवट लागत होती. पण कुठलाही खाद्यपदार्थ शिल्लक टाकायचा नाही ही आश्रमाची शिस्त अंगात भिनलेली होती. आम्ही दोघांनीही ते आईस्क्रीम संपवले आणि थोड्याच वेळात मला गरगरायला लागले. राजारामाची अवस्थाही काहीशी तशीच होती. मग मात्र मला शंका आली. ‘राजाराम काय केलंयस तू? काय घातले होते आईस्क्रीममध्ये’

‘अनु, आपल्या सर्व चिंता आता संपून जातील, आता कोणीही आपल्याला त्रास देऊ शकणार नाही’ असे म्हणत राजाराम गडाबडा लोळू लागला. मीही खाली पडले.’

‘राजाराम मला फसवलेस तू. मला मरायचे नव्हते रे.’ असे मी तिरस्काराने त्याला म्हणाले.

आणि काही क्षणातच सगळं काही शांत झाले. राजाराम मला सॉरी सॉरी म्हणत असल्याची माझी शेवटची जाणीव. मला गाढ झोप लागून गेली.

मला जाग आली ती वेगळ्याच विश्वात. माझे स्वतःचे आणि राजारामचेही मृत शरीर समोर पडलेले मला दिसत होते. मी हवेत तरंगत होते. माझे मानवी जीवित अस्तित्व संपलेले होते. राजारामने अतिशय भ्याडपणे स्वतःला आणि मलाही संपवून टाकले होते. मला सगळे काही दिसत होते, कळत होते पण मला शरीरच नव्हते. राजारामचा आत्मा काही दिसत नव्हता. आणि त्यादिवसापासून आजतागायत मी असेच आयुष्य जगतेय. या घरावर माझे मनापासून प्रेम होते, त्यामुळे मृत्यूनंतरही मला या घराचा मोह सुटत नव्हता.

दोन-तीन दिवसांनी ते चार पाच जणांचे टोळके आले. बाहेरून त्यांचे अचकट विचकट बोलणे ऐकू येत होते. काहीवेळाने त्यांनी गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. आणि खिडकीतून डोकावून बघितले. आमची शरीरे बघून ते घाबरले. मी अतिशय चिडले होते आणि मी बाहेर जायचा प्रयत्न केला आणि काय आश्चर्य, दरवाजा न उघडताही मी बाहेर जाऊ शकत होते. मी बाहेर जाताच एका गुंडाच्या तोंडात मारली. आजूबाजूला कोणी दिसत नसताने आपल्याला कोणी मारले हे तो बघू लागला. मी पुन्हा एक मारली आणि मग मारतच सुटले. बाकीचे चौघे त्याला ओढत होते, मी त्यांनाही मारत सुटले. आणि मग ते भूत भूत म्हणत ओरडत पळत सुटले. मला खूप आनंद झाला. या रूपात का होईना पण मी माझा काहीप्रमाणात बदला घेतला होता. ते शहरात पोहोचल्यावर त्यांच्या अवस्थेमुळे लोकांना कळले कि बंगल्यात काहीतरी घडलंय आणि लोकांची रीघ लागली. पोलिसही आले. सर्व सोपस्कार झाल्यानंतर सगळे काही संपले आणि मी या बंगल्यात एकटी राहिले.

राजारामच्या खिशात पोलीसांना एक पत्र मिळाले. त्यात ‘आम्ही गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहोत’ असा मजकूर होता. दुसऱ्या एका पत्रात हा बंगला आश्रमाला दान केला होता. पहिल्या पत्रावरून पोलिसांनी त्या पाचही गुंडांना अटक केली आणि त्यांची रवानगी जेल मध्ये झाली. वर्षभर हा बंगला तसाच पडून होता. मग दादा-वहिनींनी हा बंगला भाड्याने देण्यासाठी म्हणून एका इस्टेट एजंटला सांगितले. त्याने काही दिवसांनी एक भाडेकरू आणले. एक मद्रासी कुटुंब होते. ते जेंव्हा घर बघत होते त्यावेळी मी रागावून एक पातेले खाली टाकले. त्याचा आवाज ऐकताच ते सर्वजण आणि तो एजंटही पळून गेले. मग काय मला हा बंगला सांभाळायची ट्रीकच मिळाली. यानंतरही एकदोनदा हा बंगला बघायला भाडेकरू यायचे पण काही ना काही करून मी माझे अस्तित्व दाखवून द्यायची. यामुळे हा बंगला भुताटकीने पछाडलेला आहे हे सर्वांनाच माहित झाले आणि इकडे कोणीही यायचे बंद झाले. माझ्या दहशतीमुळे आजूबाजूच्या प्लॉट मध्ये सुद्धा कोणी बांधकाम करायचा प्रयत्न केला नाही. बस! हा बंगला, हा परिसर माझा आहे, माझ्या एकटीचा आहे.’

एवढे बोलून अनुराधा गप्प झाली. पण मधूनच तिचे हुंदके आणि सुस्कारे ऐकू येत होते. तिची हकीकत ऐकून मीही एकदम दिग्मूढ होऊन गेलो होतो. ‘ती’ एक अमानवी स्त्री होती हेही मी विसरून गेलो होतो. तिला कसा दिलासा देता येईल याचाच श्रीकांत विचार करत होता. अन अचानक त्याच्या लक्षात आले कि हिने आतापर्यंत सर्वांना इथून पळवून लावले पण मग आपल्यालाच ही एवढी मदत का करतेय? तिच्या या कृतीचा अर्थ लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही.

तिला धीर द्यायच्या उद्देशाने श्रीकांत म्हणाला 'हे बघ अनु, जे झाले ते नक्कीच फार वाईट घडले. राजारामने खरे तर तुझा खूनच केलाय हे मला अगदी मान्य आहे. पण आता तू अशी किती दिवस अतृप्त घोटाळत राहणार?

यावर ती विषन्न हस्त म्हणाली 'बस आता या भूत योनीतुन सुटका होईपर्यंत अशीच या घरात रेंगाळत राहणार मी.

यावर श्रीकांत पटकन म्हणाला 'मला एक सांग अनु, आतापर्यंत तू सर्वांना इथून पिटाळून लावत होतीस, मग माझ्याबाबतीतच एवढी मेहेरबान का झालीस? यावर ती काही बोलली नाही. बराच वेळ काहीच उत्तर येत नाही असे पाहून मी पुन्हा म्हणालो.

'सांग ना, मला या घरातून पिटाळून का लावले नाहीस, उलट तू माझी एवढी बडदास्त का ठेवते आहेस?

‘सांगायलाच हवं का?.. तिने विचारले. ‘हो’ सांग’ मला जाणून घ्यायचे आहे’!

‘श्रीकांत, राजाराम बरोबरचं माझं लग्न ही मनात नसताने त्यावेळी केलेली तडजोड होती. लग्नानंतर मी पूर्णपणे त्याच्यात विसर्जित होऊन जाण्याचा प्रयत्नदेखील केला. पण आम्ही मनाने कधी एक झालोच नाही. त्यातूनही त्याचा अल्पसंतुष्ट स्वभाव, भेकड वागणं याची मला जबरदस्त चीड यायची. आम्हाला मूल झालं असतं तर कदाचित आमच्यातील हे अंतर संपलं असतं, पण तिथेही राजाराम पूर्णत्वाला नाही जाऊ शकला. मला मुलांची हौस होती, म्हणून एका वर्षातच मी स्वतःची डॉक्टरकडून टेस्ट करून घेतली होती. माझ्यात काही दोष नव्हता. राजाराम मात्र अशी टेस्ट करून घेण्याला तयार नव्हता. त्यामुळे तो माझ्या मनापासून अजून अजून दूरच होत गेला’ अनुराधा स्वगत बोलल्यासारखी म्हणाली. काहीवेळ थांबून ती पुन्हा बोलू लागली. यावेळचा तिचा स्वर अगदी स्वप्नाळू वाटत होता.

‘श्रीकांत, तुमचा विश्वास बसणार नाही पण मी मघाशी तुम्हाला माझे स्वप्न सांगितले ना, त्या माझ्या स्वप्नात जो राजकुमार यायचा तो अगदी तुमच्यासारखाच होता. पण माझे दुर्दैव बघा, ज्याची मी वाट पाहत होते तो मला जिवंत असताने नाही मिळाला, तर अशावेळी मिळालाय कि मनात आणलं तरी तो माझा होऊ शकत नाही’ अनुराधा विषादाने म्हणाली.

‘का नाही होऊ शकत’ अभावितपणे श्रीकांतच्या तोंडून प्रश्न गेला आणि तो लगेच ताळ्यावरही आलो. अरे काय विचार करतोय आपण? एका भुताबरोबर आयुष्याचं स्वप्न बघतोय आपण. त्याच्या अचानक स्तब्ध होण्याने तिला त्याच्या मनातले विचार कळले असावेत.

‘आलं ना लक्षात, माझ्या मनातला राजकुमार मला का मिळू शकत नाही म्हणून’ तिच्या शब्दातला निराशाजनक विषाद श्रीकांतला जाणवत होता. किचनचा पडदा हलला तेंव्हा त्याला जाणवले कि ती आत निघून गेलीय म्हणून. श्रीकांतचे डोकं अगदी भन्न झालं होतं. काही न बोलता तो उठला आणि बेडरूममध्ये गेला. त्याने बेडवर अंग टाकले पण विचारांनी डोक्यात थैमान मांडले होते. काय चाललंय तेच कळत नव्हते. आपण कशात अडकलोय? भुताने पछाडणे म्हणतात ते हेच का? आतापर्यंत भुताच्या ऐकलेल्या गोष्टींमध्ये भूत हे खूप वाईट असते असेच ऐकले होते. पण हे भूत तर खूप चांगलं आहे. एखादी घरंदाज स्त्री काय आपल्या पतीची सेवा करेल इतक्या आपुलकीने ती माझी सेवा करत होती. एका अमानवी, अशरिरी अस्तित्वाने आपल्यावर प्रेम करावं हे बुद्धीला पटत नव्हते. अशाच आडव्या तिडव्या विचारातच कधीतरी त्याला झोप लागून गेली.

सकाळी जेंव्हा मला श्रीकांतला जाग आली तेंव्हा तो मंद मोगऱ्याचा वास अगदी आपल्या जवळच येत असल्याचे त्याला स्पष्ट जाणवले. आतापर्यंत ती कधी त्याच्या बेडरूम मध्ये आली नव्हती. त्याने आळस देत अन थोडेसे हसून ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं. अंधारातून आवाज आला ‘झाली का झोप?, उठा आता. मी चहा टाकते’ असे म्हणत तो आवाज त्याच्या पासून दूर झाला. श्रीकांत उठला आणि बाथरुमकडे गेला. बाथरूममध्ये त्याचे टॉवेल व इतर कपडे व्यवस्थित ठेवलेले होते. काळ संपत आलेल्या साबणाचा नवीन पॅक सोफ केस मध्ये दिसत होता. त्याने आंघोळ उरकली. ओले कपडे तसेच बाथरूममध्येच सोडून तो किचनमध्ये आला. आज उपमा केलेला दिसत होता. त्याने नाश्ता आणि वरून गरम गरम चहा घेतला आणि तो आपल्या बेडरूममध्ये आला. कपडे करून तो हॉलमध्ये आला. किचनकडे पाहत ‘येतो मी’ म्हणत बाहेर पडला. तिचे प्रत्यक्ष दिसणे आणि शरीर स्पर्श सोडला तर अगदी एखाद्या नवविवाहित जोडप्याने वागावे असे दोघांचेही चालले होते.

बँकेत गेल्यावर नेहमीप्रमाणे गोखलेंनी त्यांची काजीने चोकशी केली. श्रीकांतने जरा तिरसट आवाजाताच त्यांना म्हटले

'हे बघा गोखले, तुमची काळजी मला कळते. पण असे रोज रोज घरगुती गोष्टी बोललेल्या मला आवडत नाहीत. तेंव्हा यापुढे फक्त कामाचे बोलत जा. आणि हो, सगळ्या स्टाफला एकदा ही कल्पना द्या!.

त्याच्या या बोलण्याने गोखले चांगलेच दुखावले. काही न बोलता ते बाहेर आले. पडेल चेहऱ्याने त्यांना बाहेर येताने पाहून शेजारच्या टेबलवरील स्मिता वागळेने विचारलेच. मनात नव्हते पण एकदाचे सांगायचे आहेच म्हणून गोखलेंनी तिला श्रीकांत काय बोलला ते सांगितले. आता या वागळे कडून सर्व स्टाफला कळणारच होते.

दिवसभरात काही विशेष न घडता श्रीकांत संध्याकाळी घरी आला. सवयीने आवरून चहापाणी झाल्यावर तो निवांत टीव्ही बघत बसला. ‘ती’ आजूबाजूला वावरत होतीच. एव्हाना बाहेर अंधार झाला होता. थोडयावेळाने घड्याळाकडे बघत त्याने शेजारच्या टीपॉय वरून ग्लास आणि ब्लेंडर्सची बाटली उचलून घेतली. त्याबरोबर तिकडे पडद्याची सळसळ झाली. काही क्षणात स्नॅक्सच्या डिश समोर हजर झाल्या. एक पेग झाल्यावर त्याच्या मेंदूवर ती हवीहवीशी वाटणारी तरलता पसरली. त्याला काय वाटले काय माहित पण ही जी कोण आहे तिला आपण प्रत्यक्ष पाहायला हवं असं त्याला वाटलं. मनात विचार येताच त्याने ग्लास बाजूला ठेवला.

‘अनु, मला तुला पहायचं आहे’ अचानक श्रीकांत म्हणाला. यावर तिच्याकडून काहीही प्रतिक्रिया झालेली दिसली नाही. त्याने पुन्हा हट्टाने तेच शब्द उच्चारले तरी पण काहीच घडले नाही. मग एखादया लहान मुलासारखा फुरंगटून जात तो म्हणाला ‘ठीक आहे, तू जोपर्यंत मला दिसणार नाहीस तोपर्यंत मी जेवणार नाही’ असे म्हणत त्याने पुन्हा एक पेग भरून घेतला आणि रुसल्यासारखा टीव्हीकडे बघत बसला. असाच खूप वेळ गेला. स्वयंपाक घरात येणाऱ्या आवाजांवरून आत ताट वाढले आहे हे त्याला कळत होते. पण तो उठला नाही.

‘चला ना जेवायला’ तिचे शब्द फक्त ऐकू आले. तरीही त्याने बिलकूलही दखल घेतली नाही.

‘अहो असा काय हट्ट करताय? भूत कोणाला दिसत नाही हे तुम्हाला माहित असेलच ना’ ‘तिने’ म्हटले.

‘सामान्य भूत असते तर हे मान्य झाले असते, पण तुझ्या करामती पाहता तू नक्कीच मला दिसू शकशील.’ श्रीकांत तार्किक मुद्दा मांडत म्हणाला. बराच वेळ गेल्यानंतर तिचा आवाज आला.

‘ठीक आहे, मी तुमच्यासमोर येऊ शकेल, पण ते फक्त दिवस मावळल्यानंतर आणि तो पुन्हा उगवेपर्यंत’ अनुराधा म्हणाली. तसा श्रीकांत सरसावून बसत म्हणाला ‘चालेल मला’ पण यावर अंधारातून शब्द आले ‘श्रीकांत, इतके सोपे नाही ते, यात एक रिस्क आहे. जर तुम्ही मला स्पर्श केला किंवा माझा चुकून तुम्हाला स्पर्श झाला तर तर…तर’… एवढे बोलून ती थांबली.

'तर्रर्रर्र काय?.. श्रीकांत आतुरतेने म्हणाला.

‘तर जे काही घडेल ते फार वाईट असेल’ म्हणून मी तुम्हाला विनंती करते कि तुम्ही हा हट्ट सोडा. माझे इथे तुमच्या आजूबाजूला असणे तुम्हाला पुरेसे नाही का? तिने पुन्हा एकदा त्याचे मन वळवायचा प्रयत्न केला.

'समजा स्पर्श झाला तर काय घडेल? श्रीकांतने विचारले. काहीवेळाने तिचे शब्द ऐकू आले.

‘ज्याक्षणी तुम्ही मला स्पर्श कराल, त्याच क्षणी माझ्या सर्व शक्ती निष्प्रभ होतील, आणि … आणि त्याच क्षणी तुम्ही हे मानवी शरीर सोडून पिशाच्च योनीत याल, तुमचा मृत्यू ओढवेल’ एवढे बोलून ती हुंदके देऊन देऊन रडू लागली. यावर श्रीकांत चांगलाच हादरला. पण थोड्यावेळाने त्याला एक मार्ग सापडला.

‘हे बघ, हे सगळे कधी होईल तर मी तुला स्पर्श केला तर ना. पण मी तुला वचन देतो कि मी तुला स्पर्श करणार नाही. पण मला तुला पाहायचे आहे’ तो ठामपणे म्हणाला.

‘बरं येईल मी तुमच्यासमोर. पण अगोदर जेवण तरी करा’

‘नाही, तुला बघितल्याशिवाय मी एक घासही घेणार नाही’ श्रीकांतने पुन्हा जाहीर केले. एक क्षण, दोन क्षण असा कितीतरी वेळ गेला. कपड्यांची सळसळ ऐकू येत होती. ती इकडून तिकडे गेल्याचे मोगऱ्याच्या वासावरून कळतही होते. पण त्याला दिसत मात्र काहीच नव्हते. त्याचा अधीरपणे वाढतच होता.

'येणार आहेस कि नाही समोर? तो रागावून म्हणाला.

'अहो, जरा धीर धरा. एवढे काय उतावीळ होताय. आम्हा बायकांचं आवरणं, सावरणं काय असतंय तुम्हाला माहीत नाही का?.. ती म्हणाली.

‘मला कसं माहित असेल? माझं लग्न कुठंय झालंय अजून’ तो हसत म्हणाला.

‘मग एखादी छानशी मुलगी शोधा आणि उरकून टाका लग्न’ तीही हसत म्हणाली.

'तुला चालेल? श्रीकांतने खोचक शब्दात विचारले. यावर उत्तर न देता ती गप्प झाली. कपड्यांची सळसळ मात्र ऐकू येत होती. श्रीकांतला आता अजिबात दम निघत नव्हता. कधी एकदा ती समोर येतेय असे त्याला झाले होते. अखेर त्याचा अगदी अंत पाहत तिचे शब्द त्याच्या कानावर आले.

‘अहो, मी येतेय. पण तुम्ही अगोदर डोळे मिटा पाहू’ ती लाडीकपणे म्हणाली.

‘वा, हे बरंय. तुला बघायला मी आतुर झालॊय अन तू मात्र डोळे मिटून घ्यायला सांगते आहेस. मी नाही डोळे मिटणार’ तो लहान मुलाच्या हट्टाने म्हणाला.

‘बरं, राहीलं. नका डोळे मिटू पण मी सांगितलेले लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याचा आणि माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे’ तिने त्याला पुन्हा एकदा आठवण करून दिले.

‘बरं, बरं, लक्षात आहे माझ्या. आता ये समोर पटकन’ अधीर होत श्रीकांत म्हणाला.

अचानक घरातील सर्व दिवे विझले. अन काही क्षणातच पुन्हा अगदी मंद प्रकाश टाकत पेटले. श्रीकांत अंधारात डोळे फाडून बघत होता. किचनचा पडदा बाजूला झाला. किचनच्या दरवाज्यात एक स्त्री उभी असल्याचे अंधुक दिसत होते. हळूहळू दिवे मोठे होत गेले. आणि ‘ती’ दृश्यमान झाली. तिथे एक मनमोहक निखळ सौंदर्यवती उभी होती. उंच शिडशिडीत पण अगदी आखीव रेखीव शरीरयष्टी. चेहऱ्यावर एक मार्दव. कुठलाही भडकपणा नाही पण कुणाही पुरुषाला भुरळ घालेल असा त्या चेहऱ्यात एक अवर्णनीय गोडवा होता. श्रीकांत तिच्याकडे बघतच बसला. यावर काही प्रतिक्रिया द्यावी हेही त्याला कळत नव्हते. अगदी स्पेलबाऊंड झाल्यासारखा तो तिच्याकडे पाहत होता. ती अगदी सुमधुर हसत म्हणाली 'झालं ना समाधान?

तिच्या त्या बोलण्याने तो भानावर आला. हे एवढे स्वर्गीय सौंदर्य त्या राजारामच्या भेकड स्वभावामुळे काळाच्या पडद्याआड जात या पिशाच्च योनीत भटकतेय. तिच्याकडे बघत तो म्हणाला 'ये ना जवळ, इतकी दूर का उभी आहेस?.. मंद मंद पावले टाकत ती त्याच्यापासून काही अंतरावर येऊन थांबली. तो सोफ्यावरून उठू पाहताच ती दोन पावले मागे जात हसत म्हणाली. ‘अं हं, पुढे यायचे नाही.’

'ओ गॉड, राजारामच्या अगोदर मला का नाही ग भेटलीस? असे म्हणत तो पुन्हा सोफ्यावर बसला.

त्याचा तिच्याकडे बघत बघत गप्पा मारण्याचा हेतू होता. त्याचा तो इरादा ओळखून ती म्हणाली 'आता चलताय ना जेवायला?..

तिच्याकडे बघत तो म्हणाला ‘इतके सौंदर्य समोर उभे असताना भूक कशी लागेल? तू अशीच माझ्यासमोर उभी राहा, तुला बघूनच माझे पोट भरेल’ मिशिकीलपणे हसत तो म्हणाला.

‘यापुढे रोजच मी तुमच्यासमोर असणार आहे. तेंव्हा तुम्ही मला हवे तेवढे पाहू शकाल’ आता अगोदर जेवायला चला.’ यावर श्रीकांतनेही मग फार आढेवेढे घेतले नाहीत. तो हात धुऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला. त्याच्या पासून सुरक्षित अंतर राखत तिने ताट वाढत त्याच्या समोर सरकवले. त्याने जेवायला सुरुवात केली खरी पण आपण काय खातोय याचे त्याला अजिबात ध्यान नव्हते. तो तिच्या तोंडाकडे बघत ताटातले पदार्थ संपवत होता. ती ही मंदपणे हसत, लाजत त्याच्या ताटात अजून अजून पदार्थ वाढत होती. बऱ्याचवेळाने त्याला आपल्या पोटाला अगदी तड लागली असे जाणवले. अन त्याने खाणे थांबवले. त्याने ताटातच हात धुतले आणि उठताने त्याला आपण किती खाल्ले असावे याची जाणीव झाली.

‘आई ग, अगं किती खायला घातलस, मला अगदी जागेवरून उठावेसे वाटत नाही’ पोटावरून हात फिरवत श्रीकांत म्हणाला. अगदी मुश्किलीने चालत तो सोफ्यावर येऊन बसला. बसला म्हणण्यापेक्षा कोसळलाच. तिकडे स्वयंपाकघरात आवराआवर चालल्याचे आवाज येत होते. आवरून ती बाहेर आली कि तिला समोर बसवून मन भरेपर्यंत पाहत तिच्याबरोबर रात्रभर गप्पा मारायच्या असं त्याने मनाशी ठरवले होते. पण भरल्या पोटी त्याचे डोळे गपागप मिटत होते. त्याने प्रयत्न करूनही डोळे उघडे राहत नव्हते, आणि काही क्षणातच तो तिथेच सोफ्यावर गाढ झोपून गेला.

सकाळी त्याला जाग आली ती पुन्हा मोगऱ्याच्या मधुर वासाने. त्याने आजूबाजूला बघितले पण अनुराधा कुठे दिसत नव्हती. क्षणभर त्याला कळेना कि काल जे बघितले ते खरं होते कि स्वप्न? आपण तर सोफ्यावरच झोपी गेलो होतो आता मात्र बेडवर आहोत. पण थोड्या वेळातच त्याच्या मनातील हे सर्व प्रश्न गायब झाले. अनुराधाच्या गूढ शक्तीची प्रचिती त्याला पुन्हा एकदा आली. पण ती दिसत का नाही? त्याने अज्ञातात पाहत विचारले

‘अनु, कुठे आहेस तू?’ मला दिसत का नाहीस? खळखळून हसण्याबरोबरच तिचा आवाज आला

‘अहो, विसरलात काय, मी फक्त रात्रीच तुम्हाला दिसू शकते. आता दिवस उगवला आहे’ चला उठा, ऑफिसला जायचं आहे ना? अगदी एखाद्या सुविद्य संसारी स्त्री सारखे तिने त्याला बाथरूममध्ये पिटाळलं आणि चादरींची आपोआप घडी घातली जाऊन ती कपाटात ठेवली सुद्धा गेली.

श्रीकांत आणि पिशाच्च रूपातील अनुराधा यांचा अनोखा संसार सुरु झाला. श्रीकांत अगदी वेळेत बँकेत जात होता. आपले काम इमानदारीत करत होता, आणि कोणाशीही काही संबंध न ठेवता घरी येत होता. कुणी वैयक्तिक काही प्रश्न विचारले तर तो चिडून त्या माणसाला तोडून टाकणारे बोलत होता किंवा काहीतरी थातुरमातुर कारण सांगून वेळ मारून नेत होता. हळूहळू त्याच्या बद्दल एक गूढ वातावरण तयार होत होते. ‘तो’ बंगला शापित आहे हे सर्वांना माहित होते. त्यामुळे काहीदिवसातच साठे साहेब सुद्धा तिथून बाहेर पडून दुसरी जागा शोधतील असे सर्वांनाच वाटत होते. अल्ताफने तर दुसरा एक चांगल्या वस्तीतील फ्लॅट त्याच्यासाठी शोधूनही ठेवला होता. पण श्रीकांत कडून काहीच तक्रार येत नव्हती. उलट तो जास्तच खुश असल्यासारखा वाटत होता. फक्त तो कोणाशी वैयक्तिक विषयावर बोलत नव्हता. त्यावर असतो एकेकाचा स्वभाव, नाही आवडत काहींना असे विषय’ असा सोयीस्कर अर्थ काढत बँकेतील कर्मचारी निवांत झाले होते.

संध्याकाळी बँकेतून आला कि श्रीकांत आणि अनुराधा आवरता आवरता गप्पा मारायचे. कधीकधी तो व्हरांड्यातल्या झोपाळयावर बसून चहा घ्यायचा. अनुराधाही तिथेच जवळपास अदृश्य रूपात वावरत असायची. मोगऱ्याचा वास ही तिला ओळखण्याची खूनच झाली होती. दिवस मावळला कि मात्र ती धुरकट धुरकट रूपातून हळूच मूळ रूपात यायची. त्या वेळेची श्रीकांत आतुरतेने वाट पाहायचा. दिवसेंदिवस ती त्याला अजूनच सुंदर दिसू लागली होती. मूळचीच अनुराधा सुंदर होतीच आणि आता तर तिच्याही मनावर या अनोख्या प्रेमाची धुंदी चढू लागली होती. त्यामुळे तिचे सौंदर्य अजूनच खुलून गेले होते. तशी ती नेहमी साध्या साडीतच वावरायची.

‘अनु, तू नेहमी साडीच का वापरतेस? पंजाबी ड्रेस घातलास तर तू अजून सुंदर दिसशील’ एकदिवस श्रीकांत तिला म्हणाला.

‘आश्रमात १५ वर्षाच्या पुढील मुलींना कम्पलसरी साडीच वापरावी लागायची. मलाही पंजाबी ड्रेस फार आवडत असत. लग्न झाल्यानंतर मी राजारामला म्हणाले सुद्धा कि मला पंजाबी ड्रेस आणून दे. पण त्याने या गोष्टीला स्पष्ट नकार दिला. ‘घरंदाज स्त्री ही साडीतच शोभून दिसते’ असं काहीसं पुस्तकी वाक्य टाकून त्याने माझी इच्छा मारून टाकली. नंतर जॉब लागल्यानंतर समाजाच्या वखवखलेल्या नजरा बघून मलाही पटले कि पंजाबी ड्रेस घालणे म्हणजे लोकांच्या नजरा उलट आपल्याकडे वळवून घेणे होईल. मग मी तसा कधी प्रयत्न केलाच नाही.’ तिने त्यावर हे लांबलचक स्पष्टीकरण दिले. त्यालाही ते पटले.

‘मग आता तुझी ती इच्छा पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. तू ड्रेस वापर, माझ्याशिवाय तर तुला कोणी बघणार नाही’

श्रीकांतने म्हणाला. ‘हवे तर मी तुला ड्रेस आणून देतो’

यावर हसत हसत ती म्हणाली, ‘त्याची काही गरज नाही’ मी हवा तो ड्रेस आणू शकते, आणि घालू शकते’

‘पण आम्हाला जर तुला एखाद्या विशिष्ठ ड्रेसमध्ये बघायचे असेल तर’ श्रीकांत चावटपणे म्हणाला.

‘हूं, तुमच्या अपेक्षा वाढत चालल्यात. पण काही हरकत नाही. तुम्हाला जो ड्रेस आवडेल, त्या ड्रेसकडे पाहून तुम्ही क्षणभर डोळे मिटून घ्यायचे आणि मनात फक्त ‘अनु’ एवढेच म्हणायचे. तो ड्रेस मला मिळालेला असेल’ अनु हसत म्हणाली.

‘च्यायला गम्मतच आहे, कसं जमतं हे तुला’ श्रीकांतने औत्स्युक्क्याने विचारले.

‘त्यासाठी स्वतःच्या जीवाची होळी करून घ्यावी लागते’ विषादाने ती म्हणाली. त्याने तिथेच विषय सोडून दिला.

दुसऱ्या दिवशी श्रीकांतने प्रयोग करून बघायचे ठरवले. बँकेत शिरतानेच त्याला समोरच पी.आर.ओ. काउंटरला मालिनी सावंत उभी असलेली दिसली. ही मालिनी मुळातच एकदम मॉड होती, आणि तिचे ड्रेसही मॉडर्न असायचे. ती अजून तिच्या जागेवर बसलेली नव्हती. त्यामुळे श्रीकांतला ती सहजपणे दिसली. तिने हसत श्रीकांतला ‘गुड मॉर्निग सर’ म्हटले. श्रीकांतने क्षणभर तिला निरखत डोळे मिटले आणि मनात ‘अनु’ म्हटले. आणि तिला पटकन ‘गुड मॉर्निंग’ म्हणत तो आपल्या केबिनमध्ये शिरला. रोज एकदम रुक्ष वागणाऱ्या साठे साहेबांनी चक्क आपल्याकडे फक्त पाहिलेच नाही तर ‘गुड मॉर्निंग’ सुद्धा म्हटले. स्वतःवरच खुश होत ती आपल्या डेस्ककडे वळण्याऐवजी मागच्या बाजूला बसलेल्या शेफालीकडे गेली आणि तिच्या कानात आताचा प्रसंग सांगायला लागली.

श्रीकांत संध्याकाळी खुशीतच घरी आला. पण अजून दिवस मावळला नव्हता. त्याने आपले नेहमीचे प्रोग्रॅम घाईघाईतच उरकले आणि तो रात्र व्हायची वाट पाहत बसला.

‘आज स्वारी भलतीच खुशीत दिसतेय. आम्हाला पण कळू दे खुशीचे कारण’ अंधारातून तिचा आवाज आला.

‘नाही, मी नाही सांगणार. ते आमचं गुपित आहे’ असं म्हणत तो हसला. अनुही हसली, पण तिच्या हसण्याचे कारण वेगळे होते. श्रीकांत सोयीस्करपणे हे विसरून गेला होता कि ती एक पिशाच्च आत्मा आणि तिच्यापासून काहीच लपून राहू शकत नव्हतं. पण तिने याची त्याला आठवण करून दिली नाही.

थोड्यावेळात अंधारून आले. त्याने आजूबाजूला पाहिले, कुठे अनु दिसतेय का, पण कुठेच नाही. मग तो बाहेर जाऊन दक्षिण दिशेला बघून खात्री करून आला कि दिवस खरंच मावळलाय. पुन्हा तो आत येऊन तिच्या येण्याची वाट पाहत बसला. पण अनु काही येत नव्हती. शेवटी न राहवून त्याने हाक मारलीच 'अनु, अगं येना, किती वाट पाहायला लावते आहेस?.. आणि हळूहळू किचनच्या दरवाज्यात अनुची धूसर प्रतिमा स्थिर होत होत मानवी रूपात अवतीर्ण झाली. तिला बघून श्रीकांत अवाक झाला. सकाळी बँकेतल्या मालिनीच्या अंगावर होता अगदी तसाच (कि तोच) फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस अनुने घातला होता. तिच्या मूळच्याच घाटदार शरीराला या पंजाबी ड्रेसने अजूनच सौंदर्य बहाल केले होते. तीही लाजत लाजत स्वतःचे रूप त्याच्या डोळ्यातून पाहत होती. तिची जिवंतपणाची अतृप्त इच्छा आज अशा स्वरूपात पूर्ण होत होती. स्त्रीला सुद्धा आपल्या सौंदर्याचे स्वच्छ नजरेने रसग्रहण करणारे आपले माणूस हवेच असते. श्रीकांत अगदी मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. तिला त्यामुळे अजूनच लाजल्यासारखे होत होते. आणि दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच विचार चमकून गेला. खरंच आपण पाच-सहा वर्षांपूर्वी का नाही भेटलो? पण या जर तर ला आता तरी काही अर्थ नाही हे दोघांनाही काळात होते.

‘तुम्ही असेच जर मला बघत राहिलात तर तर… जा बाई, मला खूप लाज वाटतेय’ लटक्या रागाने अनु म्हणाली अन आत पळून गेली. श्रीकांतने मग मनाशी हसतच आपला नेहमीचा ट्रे समोर ओढला. आपण पेग भरला कि ती लगेच काहीतरी स्नॅक्स घेऊन बाहेर येईल म्हणून तो वाट बघत बसला. ती काही आली नाही पण त्याच्या समोर खाऱ्या काजूंची एक प्लेट आपोआप अवतीर्ण झाली. ते बघून तो खट्टू होत म्हणाला ‘हे काही बरोबर नाही हं, तू जरी अशी आतच लपून बसणार असशील तर नकोत आम्हाला हे काजू’ असे म्हणत त्याने प्लेट बाजूला सारली. त्याचे हे ब्लॅकमेलिंग बघून ती लगेच बाहेर आली ‘फारच हट्टी आहेत तुम्ही. तुमच्या आईंनी कसं सांभाळलं असेल तुम्हाला त्यांनाच माहित’ असे हसून म्हणत ती समोरच्या सोफयावर येऊन बसली. अचानकपणे आईचा विषय निघाल्यामुळे श्रीकांतची धूसर, बावरली नजर शांत झाली. आणि ते छान गप्पा मारत बसले. काहीवेळाने दोघांच्याही मनातले अवघडलेपण दूर झाले आणि त्यांच्या गप्पांना रंग चढला. बोलता बोलता अनुने हळूच त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीचा विषय काढला.

‘मला सांगा ना, तुमच्या प्रेयसीविषयी. कशी होती ती दिसायला? सुंदरच असणार म्हणा. तुमच्यासारख्या राजकुमाराला पसंत पडली म्हणजे अप्सराच असणार’ आम्ही काय बाबा, आपले सर्वसामान्य’ अनु म्हणाली.

‘अनु, असं नको म्हणू ग. तू खूप खूप सुंदर आहेस. तुझी हेळसांड करणारा तो राजाराम एकदम अरसिक असणार’

बोलता बोलता श्रीकांतचा स्वर अगदी हळवा झाला. ‘पल्लवी, दिसायला खूप सुंदर होती असे नाही पण तिच्यात एक जबरदस्त आकर्षण होतं. मनाने खूप चांगली होती.’ मला अजूनही वाटतं कि तिने त्या अमेरिकेत असलेल्या मुलाबरोबर स्वतःच्या मनाविरुद्ध घरच्यांच्या दबावाखालीच लग्न केले असणार.‘जाऊ दे, ती मला सोडून गेली असली तरी मला तिचा राग नाही. जिथे असशील तिथे ती सुखात राहू दे’ ओलावल्या डोळ्यातून अश्रू खाली ओघळू नयेत म्हणून त्याने ब्लेंडर्सचा मोठा सिप घेतला, आणि मागे सोफ्याला टेकून बसला.

त्याची ती कहाणी ऐकून अनुही एकदम हळवी झाली. क्षणभर तिला वाटले कि जाऊन श्रीकांतला मिठीत घ्यावं अन त्याच्या दुखऱ्या मनाला जरा दिलासा द्यावा.’ पण क्षणात ती भानावर आली आणि आपल्या अपुर्णत्वाची तिला जाणीव झाली. मग वातावरणातला उदासपना घालवण्यासाठी तिने श्रीकांतची चेष्टा करत विचारले 'मग, आज हा गुलाबी ड्रेस घातलेली कोण ललना दिसली? श्रीकांतचाही मूड लगेच बदलला. त्याने बँकेतील मालिनी बद्दल तिला सांगितले. मग त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळ रंगल्या.

दुसऱ्या दिवसांपासून त्या दोघांमध्ये अजूनच जरा मोकळेपणा आला. दोघांनीही आहे त्या रूपात एकमेकांचे अस्तित्व मान्य करून टाकले होते. श्रीकांत जाता येता एखाद्या स्त्रीने, मुलीने घातलेला ड्रेस बघून मनात अनुचे स्मरण करायचा आणि संध्याकाळी बरोबरच तसाच ड्रेस घालून अनुराधा त्याच्या समोर असायची. तसा श्रीकांत एक सभ्य गृहस्थ होता. असे मुलींकडे बघणे हे त्याच्या स्वभावात बसत नव्हते. म्हणून मग नंतर तो प्रत्यक्ष कोणाकडे बघण्याऐवजी एखाद्या सिनेमातील हिरॉईनने घातलेला ड्रेस मनात कल्पना करायला लागला. रोजचे त्याचे रुटीन व्यवस्थित चालू होते. लोकांना टाळता टाळता मात्र कधी कधी अडचण व्हायची. तसेही त्याने कोणाशी फार संबंध वाढवले नव्हते त्यामुळे फार प्रॉब्लेम नव्हता, पण अल्ताफभाई, बँकेतील त्याचे सहकारी किंवा काणे मामांसारखे अल्प ओळखीतले पण त्याच्याविषयी आपुलकीने काळजी करणाऱ्या लोकांना उत्तरे देताने मात्र त्याची तारांबळ उडायची. मुळात खोटे बोलायची सवय नसल्याने त्याच्या थापा अनेकदा संशयास्पद वाटायच्या. पण काही अघटित घडल्याचे श्रीकांतकडून कधीच ऐकायला न आल्याने तेही लोक तसे आश्वस्त झाले होते. कदाचित त्या ‘अनुग्रह’ बंगल्याविषयी उगाचच खोट्या अफवा पसरल्या असतील असेही त्यांना वाटत होते.

असाच एक महिना गेला. पुण्याहून श्रीकांतच्या आईचे पत्र आले तसा श्रीकांत भानावर आला. अनुच्या अनोख्या प्रेमात बुडून जात तो आपल्या आईवडिलांनाही विसरला होता. पंधरा दिवसांनी परत येईल म्हणाला होता पण आता चांगला सव्वा महिना होत आला होता. त्याने आईला पत्र लिहिण्यापेक्षा ट्रॅक कॉल केला आणि मी शनिवारी नक्की येतो म्हणून सांगितले. आईला खुश करण्यासाठी म्हणून त्याने एका शिपायाला सांगून दुकानातून आंबा पोळी, कोकम सरबत, सांडगे असे खास कोकणी पदार्थही मागवून घेतले.

संध्याकाळी घरी आल्यावर त्याने अनुला समोर बोलावले. जवळून आलेल्या मोगऱ्याच्या वासाने तिच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

‘अनु, उद्या मी पुण्याला जाणार आहे. आईचे पत्र आलंय आणि तसेही त्यांना भेटून बरेच दिवस झालेत’ श्रीकांत म्हणाला. यावर अनु फक्त ‘हं’ एवढेच म्हणाली. श्रीकांत आवरायला बाथरुमकडे पळाला. आपले आवरून बाहेर येईतो अंधार झाला होता. अनु आपल्या रूपात हजर झाली होती. तिच्याकडे लक्ष जाताच श्रीकांत चमकला. तिने आज अगदी साधासा दिसणारा एक ड्रेस घातला होता. तिचा चेहरा एकदम उदास झाला होता. ती काही बोलतही नव्हती. आपले जाणे तिला आवडले नाही हे श्रीकांतने ओळखले.

‘अगं अनु, मला जाणे गरजेचे आहे. आई-बाबा माझी वाट पाहत असतील. आणि दोन दिवसांचा तर प्रश्न आहे’ मी सोमवारी परत येतोच आहे’ श्रीकांत तिची समजूत घालत म्हणाला. तशी अनु जरा भानावर आली.

‘अहो, जा तुम्ही. मलाच कळायला हवंय. ते तुमचे आईवडील आहेत. त्यांचा तुमच्यावर जास्त अधिकार आहे. मी काय, इतकी वर्ष एकटी होते, तर दोन दिवसांनी काय होतंय’ अनु मोकळेपणाने म्हणाली.

‘ये हुई ना बात’ असे म्हणत श्रीकांतही हसला आणि आपली बॅग आवरायला गेला. अनुही आजूबाजूला रेंगाळत होती.

‘पण तुम्ही सोमवारी नक्की याल ना, मला करमनार नाही इथे’ अनुने तक्रार केली.

‘मला तरी कुठे करमनार आहे’ असे म्हणत श्रीकांतने बॅग बाजूला ठेवली आणि बाहेर येऊन जेवायला बसला. जेवता जेवता तो म्हणाला ‘नाहीतर तू पण चाल ना माझ्या बरोबर, कोणाला कळणारही नाही’

‘मला आवडेल यायला पण नाही येऊ शकणार. माझी ही जी काही शक्ती आहे ती फक्त या बंगल्यापरती मर्यादित आहे. इथून बाहेर पडले तर माझ्या सर्व क्रिया निष्प्रभ होऊन जातील’ aनऊ पुढेही म्हणाली. ‘मी आले तरी ना तुमच्यासमोर येऊ शकेल, ना बोलू शकेल पण त्याहीपेक्षा कुठे एखाद्या मंत्र शक्तीच्या जाळ्यात अडकले तर पुन्हा इथे येऊ शकेल कि नाही याचीही खात्री नाही मला’ अनुने शंका बोलून दाखवली.

‘अरे बापरे, मग नकोच ती रिस्क’ श्रीकांत शहारात म्हणाला. जेवण संपवून तो उठला.

श्रीकांतने सकाळी मुद्दाम दिवस उगवायच्या अगोदरच निघायचे ठरवले होते. लवकर पोहोचू हा उद्देश होताच पण त्यापेक्षा अनु तिच्या दृश्य स्वरुपात आपल्याला निरोप द्यायला हजर असेल आणि जाता जाता तिला डोळे भरून बघता येईल हाच मुख्य हेतू. ठरल्याप्रमाणे तो सकाळी लवकर उठला आणि भरभर आवरलं. तोपर्यंत अनुने तिकडे त्याच्यासाठी डबा तयार करून दिला होता आणि कडक कॉफीही थर्मास मध्ये भरून दिली होती. ‘कशाला त्रास घेतलास’ असे म्हणत तिचा निरोप घेत श्रीकांतने आपली सँट्रो रस्त्यावर आणली. अणूचे डोळे भरून आले होते. मागे वळून तिला पुन्हा एकदा हात करत श्रीकांतने गियर टाकला आणि त्याची गाडी पुण्याच्या दिशेने पळू लागली.

श्रीकांत घाट चढत होता तेंव्हा नुकताच दिवस उगवत होता. त्याने एक छान जागा बघून गाडी थांबवली. गाडीतून थर्मास काढून त्याने मग मध्ये कॉफी भरून घेतली. गाडीच्या बॉनेटला टेकून उभा राहत त्याने खालच्या हिरव्यागार निसर्गावर नजर टाकली. कॉफीचा पहिला घोट घेताच त्याला अनुची आठवण झाली. काय सुगरण आहे ही, आतापर्यंत तिने जे जे काही खाऊ घातलय ते किती उत्कृष्ट होतं. तो मनाशी तिची अशी तारीफ करत असतानेच त्याच्या अवचेतन मनाने त्याला ढोसलले. ‘अरे ती काही जितीजागति स्त्री नाही. एक अतृप्त आत्मा, पिशाच्च आहे ती. लौकिक अर्थाने म्हटलं तर एक चेटकीण. ती जे काही करतेय ते सगळे आभास आहेत, तुला या खऱ्या जगापासून तोडण्याचा तिचा प्रयत्न आहे’ हे विचार त्याच्या मनात येताच तो मुळापासून हादरला. खरंच आपण हे जे काही करतोय ते योग्य आहे का? आपण चक्क एका अतृप्त आत्म्याच्या प्रेमात पडलोय.

कॉफी संपवून त्याने पुन्हा गाडीला स्टार्टर मारला आणि तो पुढे निघाला. डोक्यातले विचार मात्र चालूच होते. आज त्याला एकदम निवांत एकटेपण मिळाले होते. त्यामुळे त्याने पहिल्या दिवसापासून घडलेल्या सगळ्या गोष्टींचा संपूर्ण आढावा घेतला. ‘अनु’ ही जिवंत स्त्री नसून ती एक पिशाच्च आहे याबद्दल तर आता काही शंका उरली नव्हतीच. पण तिने पिशाच्च म्हणून आपलं आतापर्यंत काहीही वाईट केलेले नव्हते. उलट सध्या ती आपली जेवढी काळजी घेतंय, बडदास्त ठेवतेय तेवढी लग्नाची बायको सुद्धा ठेवेल कि नाही ही शंकाच होती. शिवाय त्याला तोशिष काहीच नाही. भरतपूरला आल्यापासूनचा त्याचा सर्व पगार आहे तसा त्याच्या खात्यात शिल्लक पडला होता. त्यातून केवळ अल्ताफभाईंना त्याने या महिन्याचे भाडे दिले होते तेवढेच. अनुकडून एक शरीर सुख सोडले तर सुखी संसार म्हणून जे जे आवश्यक आहे ते सर्व त्याच्यापुढे हात जोडून उभे होते. पण तरीही हे काही योग्य नाही. एक मर्त्य मानव आणि पिशाच्च यांचे स्नेहसंबंध हे प्रकृतीच्या नियमाविरुद्ध आहेत. आपण आपल्या मनाला कुठेतरी आवर घातला पाहिजे. हे संबंध वेळीच थांबवले पाहिजे असे त्याला वाटू लागले.

गाडी जसजशी पुढे जात होती तसतसे त्याचे विचारही पळत होते. काहीवेळाने तो ‘आपण हे जे काही करतोय ते चुकीचे आहे, आपण तिच्या मोहजालातून बाहेर यायला हवे’ या निर्णयापर्यंत आला. सातारा पुणे हायवेवर जरा ट्राफिक वाढल्यावर त्याने मनातले विचार झटकून टाकत ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केले. विचारांच्या गोंधळात त्याला अनुने दिलेल्या डब्याचे आणि जेवायचेही भान राहिले नव्हते. तो दीड वाजण्याच्या सुमारासच पुण्यात अगदी आपल्या घरी पोहोचला. त्याच्या गाडीचा ओळखीचा आवाज ऐकून श्रीकांतचे आई-बाबा, निळकंठराव आणि लतिकाबाई दोघेही पोर्चमध्ये आले. श्रीकांतने बाबांना वाकून नमस्कार केला आणि आईला गाढ आलिंगन दिलं.

‘आपलं लेकरू जवळ घेतलं कि आईला अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं’ डोळे पुसत लतिकाबाई म्हणाल्या

‘लेकरू? अगं तीस वर्षाचा घोडा झालाय तो. वेळेत लग्न केलं असतं तर त्यालाही एखादं लेकरू झालं असतं’ निळकंठराव चेष्टेने श्रीकांतच्या पाठीवर एक दणदणीत थाप टाकत म्हणाले.

‘असू दे, माझं ते छोटं लेंकरूंच आहे’ लतिकाबाई खोट्या रागाने म्हणाल्या. सगळेजण आत आले. श्रीकांत म्हणाला ‘अगं आई, मला खूप भूक लागलीय, काहीतरी खायला कर पटकन’ असे म्हणत तो बाथरुमकडे पळाला. लतिकाबाई आत गेल्या पण श्रीकांतचे बोलणे ऐकून राधा मावशींनी पोळ्यांचे पीठ मळायला घेतलेही होते. लगेच चटचट दोघींनी काम उरकत स्वयंपाक केला. मघाशी पोर्चमध्येच लावलेली गाडी जरा साईडला लावूया म्हणत श्रीकांतकडून चावी घेऊन निळकंठराव बाहेर आले आणि सँट्रो सुरु करून जरा पुढे नेऊन लावली. उतरताने त्याना शेजारच्या शीटवर ठेवलेला जेवणाचा डबा आणि थर्मास दिसला. ते घेऊन ते आत आले. तोपर्यँत श्रीकांत टेबलवर येऊन बसला होता आणि लतिकाबाई त्याला वाढतच होत्या. बाबांनी तो डबा अन थर्मास टेबलवर आणून ठेवला. ते बघताच श्रीकांत एकदम चपापला. आईने तो डबा उघडून पाहत साशंकतेने विचारले 'कोणी रे दिला तुला डबा?

‘अगं आई, आमच्या बॅंकेलतील शिपाई आहे ना तोच रोज मला डबा आणून देतो. त्याचे घर माझ्या येण्याच्या रस्त्यावरच आहे. रस्त्यात खाता येईल म्हणून त्याने आजही डबा दिला’ श्रीकांतने सारवासारव केली. पण हा तर म्हणतोय पहाटेच निघालोय. इतक्या सकाळी उठून कोण असं डबा करून देणार? आईच्या कपाळावरच्या आठ्यांचे गडद जाळे श्रीकांतला स्पष्ट दिसले. तो पटकन जेवण करून उठला आणि जरा आराम करतो म्हणून बेडरूम कडे निघाला. तसे त्याला थांबवत आई म्हणाली ‘श्रीकांत, उद्या सकाळी कुठे बाहेर जाऊ नकोस. आणि जरा यावरून तयार राहा. माझी एक मैत्रीण तिच्या मुलीसह घरी येणार आहे’ त्या कशाला येणार हे श्रीकांतला चटकन उमगले. त्याने वैतागून म्हटले ‘आई, मी तुला सांगितले ना, मला एवढ्यात लग्न करायचे नाही म्हणून’ त्याने बाबांकडे मदतीसाठी पाहिले. त्यांनी आश्वस्त पने मान हलवत त्याला जणू सांगितले ‘मुलगी तर बघ, लग्न करायचे कि नाही ही नंतरची गोष्ट’ असाह्ययपणे हात उडवत श्रीकांत आत गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी दाखवण्याचा औपचारिक कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. मात्र त्या दोघी निघून जाताच श्रीकांतने आईला स्पष्ट्पणे नाही म्हणून कळवायला सांगितले. खरेतर मुलगी त्याला अगदी साजेशी होती. सुंदर तर होतीच पण हुशारही होती. CA झालेली होती. पत्रिकेत असलेला ‘कडक मंगळ’ जायची वाट बघता बघता लग्नाला थोडा उशीर झाला होता एवढेच. श्रीकांतच्या मनावर जर अनुराधाचे गारुड पसरलेले नसते तर त्यानेही होकार देऊन टाकला असता. पण याक्षणी मात्र त्याला अनु सोडून कोणत्याही स्त्री बद्दल आकर्षण वाटत नव्हते.

श्रीकांत शरीराने पुण्यात होता खरा पण त्याचं मन मात्र भरतगावच्या बंगल्यातच रेंगाळत होते. येताने ‘आपलं काहीतरी चुकतंय’ या निष्कर्षावर आलेला श्रीकांत तिच्या विरहाने मात्र विरघळला होता. घडतंय ते चुकीचे आहे कि बरोबर याऐवजी ‘जे काही आहे, जसं आहे तसं मला हवंय’ या निर्णयाप्रत तो आला होता. त्याने कसाबसा रविवार तिथे काढला अन आईबाबांच्या आग्रहाला न जुमानता परवासारखाच पहाटे पहाटे पुन्हा भरतगावला जायला निघाला. त्याला निरोप देताने लतिकाबाईंचा कंठ अगदी दाटून आला होता.

श्रीकांत मध्ये फारसे कुठे न थांबता बंगल्यावर पोहोचला. दार उघडून आत येताच मोगऱ्याच्या वासाने त्याचे स्वागत केले. तसा त्याचा सहा-सात तासाच्या ड्रायव्हिंगचा कंटाळा कुठल्याकुठे उडून गेला. दिवस असल्याने ती दिसत नव्हती पण अदृश्य रूपात असलेल्या अनुचा आनंद तिच्या हालचालींच्या आवाजावरून कळत होता. तिने त्याच्यासाठी जेवण तयार करून ठेवले होते. जेवण करून झाल्यावर ते गप्पा मारत बसले. श्रीकांतने पुण्यात त्याला दाखवायला आणलेल्या मुलीबद्दल मुद्दामच काही सांगितले नाही. पण अनुच म्हणाली

'मग, कशी वाटली दिसायला सुप्रिया? चपापून त्याने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले आणि क्षणभराने कपाळावर हात मारून घेत म्हणाला 'तुझ्यापासून काहीच लपून राहू शकत नाही ना? दोघेही मोठयाने हसले.

दुसऱ्या दिवसापासून त्यांचे नेहमीचे रुटीन सुरु झाले. जगापासून लपवून ठेवलेला त्यांचा हा आगळा वेगळा संसार अगदी सुखात चालला होता. जग त्यांच्या मध्यात पडत नव्हते आणि यांनाही जगाशी काही घेणंदेणं नव्हतं. श्रीकांत नियमितपणे बँकेत जात होता, घरी येत होता. रात्र झाली कि अनुही दृश्य स्वरूपात येत होती. तिचं जवळपास असणं त्याला खूप आनंद देत होतं. आजकाल त्याचं पिण्याचं प्रमाण जरा वाढलं होतं. एका पेगवरून तो तीन पेगपर्यंत जाऊ लागला होता. अनुच्या कृपेने बाटली कायम भारलेलीच असायची. अनुराधा त्याला थांबवायचा लटका आग्रह करायची पण पिल्यानंतरचा त्याचा आनंद, त्याच्या मनमोकळ्या गप्पा, त्याचं तिच्या प्रेमात आकंठ बुडून जाणं तिला आवडायचं. जागेपणी मात्र मध्येच त्याला कधीतरी चूक कि बरोबर हा प्रश्न पडायचाच. तिला त्याच्या मनातले सर्व विचार कळायचे. कधीतरी याला जर यातला धोका समजावून सांगणारा, याचे मन वळवणारा कोणी भेटला तर हा आपल्या हातून सुटू शकतो. त्याने जर या बंगल्यातून दुसरीकडे राहायला जायचे ठरवले तर आपण काहीच करू शकणार नाही. आणि तो गेलाच तर पुन्हा आपल्याला या बंगल्यात एकटीनेच वावरावे लागेल.

हा सर्व विचार करून श्रीकांत आपल्या ताब्यात कसा राहील याची अनु अगदी आवर्जून काळजी घ्यायची. रोज रात्री वेगवेगळे सुंदर ड्रेस घालून ती त्याला सामोरी यायची. आपण जास्तीत जास्त सुंदर कशा दिसू यासाठी शक्य ते सर्व करायची. पण हे सर्व करत असताने आपले कपडे किंवा दिसणे हे बिल्कुलही कामुक होणार नाही, शृगांरिक वाटणार नाही याचीही ती काळजी घ्यायची. चुकुन कधी याच्या मनात आपल्या बद्दल शारीरिक आकर्षण निर्माण झाले आणि श्रीकांतने आपल्याला स्पर्श केला तर सगळंच गणित बिघडून जाईल. म्हणून ती मुद्दाम त्याच्याशी जरा मायेने, ममत्वाने बोलायचा प्रयत्न करायची. कधीही आपल्या कुठल्या कृतीतून त्याच्या मनातील कामवासना जागृत होणार नाहीत याची ती काळजी घ्यायची. खरेतर हा मोह तिलाही कधीमधी पडायचा. श्रीकांतसारखा देखणा, सुदृढ तरुण जवळ असताने, आणि आपल्याला तो मनापासून आवडत असूनही आपल्या या अशरिरी कमतरतेमुळे आपण त्याला आपले सर्वस्व देऊ शकत नाही याची तिलाही खंत होती. श्रीकांतच्या मनातही आजकाल कधीतरी तिच्याबद्दल अभिलाषा निर्माण व्हायची. ही खरोखरीची आपली पत्नी असती तर? अशा विचारांनी तो उद्युक्त व्हायचा. पण त्याच्यातला सुसंस्कृत माणूस मात्र त्याला वेळीच जाग्यावर आणत होता. आपण तिला स्पर्श केला तर ती कायमची आपल्याजवळून निसटून जाईल याची त्याला भीती वाटायची.

श्रीकांत आणि अनुराधा सर्वतोपरी काळजी घेऊन एकमेकांच्या मर्यादित सहवासात गुंगून गेले होते. पण एकेदिवशी अनर्थ घडलाच!

श्रीकांतच्या ब्रँचला हेडऑफिसची टीम ऑडिट साठी आली होती. लोकांपासून दूर राहायचं म्हणून श्रीकांत पूर्णवेळ स्वतःला कामात गुंतवून घेत होता. कामाशिवाय कोणाशी इतर काहीही बोलत नव्हता. साहजिकच साहेब काम करतात म्हटल्यावर इतर स्टाफ सुद्धा तत्परतेने काम करत होता. तेच सर्व आज फळाला आले होते. श्रीकांत या ब्रँचला आल्यापासून इथला कामाचा सुधारलेला दर्जा, अपटुडेट रेकॉर्ड आणि ग्राहक संख्येत झालेली वाढ ऑडिटर ग्रुपच्या निदर्शनास आली होती. त्यांनी श्रीकांतचे अगदी सर्वांसमोर कौतुक केले होते. या घडामोडीमुळे संध्याकाळी श्रीकांत जरासा उशिरा घरी आला तोच एकदम खुशीत होता. त्याच्या खुशीने अनुही खुशीत आली होती. नेहमीचे आवरणे झाल्यावर सोफयावर निवांत बसत श्रीकांतने आज जरा वेळेअगोदरच साइड् टेबलवरची ‘ब्लेंडर्स’ उचलली आणि एक छानसा पेग भरला. दिवस मावळला होता. त्यामुळे अनुही लगेच अवतीर्ण झाली आणि तिने तळलेल्या प्रॉन्सची डिश त्याच्यासमोर आणून ठेवली. ती पाहून श्रीकांत अजूनच खुश झाला.

‘अनु, तुही बस ना अशी समोर. मला बघू तर दे डोळेभरून’ श्रीकांतने रंगात येत तिला विनवले. तीही मग त्याच्या समोरच्या सोफयावर येऊन बसली. आज तिने साडी किंवा पंजाबी ड्रेस न घालता अत्यंत आकर्षक असा नाईट गाऊन घातलेला होता. त्या गाऊनमधे ती अतिशय सुंदर दिसत होती. त्याच्या डोळ्यात होणारे बदल पाहत तिने मुद्दामच ऑफिसचा विषय काढला. श्रीकांतचं भरकटू पाहणारं मन ताळ्यावर आलं. खुशीत येत त्याने आज ऑफिसमध्ये काय काय घडलं, ऑडिटर टीमने कसं त्याचं कौतुक केलं हे अगदी मनापासून सांगितलं. अर्थात अनुला हे सगळं आधीच माहित होतं पण तरीही त्याचा विरस न करता तिने त्याचे सांगणे ऐकून तर घेतलेच पण त्याला भरभरून प्रोत्साहनही दिलं. ‘मग आहेच आमचे साहेब तेवढे हुषार’ असे म्हणत ती उठली आणि स्वयंपाकघराकडे वळली. तिचा स्वयंपाक तयार होता पण श्रीकांतचा लगेच काही जेवणाचा मूड दिसत नव्हता. टीव्हीवर ‘अनिल कपूर-श्रीदेवी’ चा लम्हे हा सिनेमा लागला होता. तो पाहत श्रीकांत हळूहळू सिप मारत होता.

एव्हाना त्याचा तिसरा पेग संपला होता. तो जेवायला येत नाही म्हटल्यावर अनुही परत त्याच्यासमोर येऊन बसली. श्रीकांतने आता चवथा पेग भरून घेतला. त्याच्या अडखळत बोलण्यावरून साहेबांना आज जरा जास्तच चढलीय हे अनुने ओळखले. पण त्याला थांबवून त्याच्या आजच्या आनंदाचा विरस करावा असे तिला वाटत नव्हते. त्यांच्या गप्पा आज पुन्हा श्रीकांतच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीवर घसरल्या होत्या. त्यामुळे श्रीकांतच्या जुन्या जखमा पुन्हा खरवडल्या गेल्या होत्या. अन त्याच्या पिण्याचा वेग वाढला होता.

त्याने पाचवा पेग भरायला बाटलीकडे हात नेताच अनु मात्र चपळाईने उठली आणि तिने बाटली उचलून घेतली. पण हीच चपळाई तिला आणि त्यालाही भोवली. ती बाटली उचलतेय असे पाहून श्रीकांत तिच्या हातातून बाटली घेण्यासाठी घाईने उठला पण त्याने अगोदरच भरपूर पिल्यामुळे त्याचा पुढे तोल गेला. तो पडतोय असे पाहून अनु घाबरून गेली आणि सगळे विसरून तिने त्याला आधार देण्यासाठी आपल्या कवेत पकडले.

अजाणतेपणी दोघांचा एकमेकांना स्पर्श झाला. त्याच क्षणी अचानक घरातील लाईट बंद झाले. पावसाळ्याचे दिवस नसूनही काडकन आवाज करत वीज चमकून गेली. बाहेरच्या झाडांमध्ये अनैसर्गिक सळसळ झाली. कुठल्यातरी झाडावर बसलेली वटवाघळं ची ची आवाज करत उडाली आणि सैरावैरा बंगल्याभोवती फिरू लागली. दूर रस्त्याच्या बाजूला रेंगाळणारी दोन-तीन भटकी कुत्री भेसूर आवाज करत इवळू लागली. एकमेकांवर भुंकू लागली.

इकडे अनुने श्रीकांतला पकडले असले तरी तिच्या मिठीत फक्त श्रीकांतचे आभासी विरविरीत अस्तित्व होते. श्रीकांतचे मूळचे धडधाकट शरीर खाली फरशीवर पडले होते. त्याचा प्राण कधीच त्याला सोडून गेला होता. त्याचबरोबर अनुच्या सर्व शक्तीही तिला सोडून गेल्या होत्या. एकमेकांच्या मिठीत बद्ध असलेले अनु आणि श्रीकांत हेही हळूहळू हवेत विरून जात होते. त्यांचे आभासी अस्तित्व अक्राळ विक्राळ रूप धारण करत काहीवेळातच अनंतात विलीन होऊन गेले. आता त्या अंधाऱ्या बंगल्यात फक्त श्रीकांतचे मृत शरीर पडून होते. बाकी सर्व शांत झाले होते.

दुसरा दिवस उगवला पण ‘अनुग्रह’ बंगला मात्र शांतच होता. दोन-तीन दिवस झाले तरी साठे साहेब बँकेत आलेले नव्हते. सर्व स्टाफ आश्चर्य करत होता. साठेसाहेब कामाच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. त्यामुळे न सांगता असे तीन दिवस गैरहजर राहणे त्यांच्या स्वभावात बसत नव्हते. गोखल्यांना काही राहवले नाही. त्यांनी अल्ताफला फोन केला आणि साठे साहेबांबद्दल काही कल्पना आहे का ते विचारले. अल्ताफलाही काहीही माहित नव्हते. काहीतरी अघटित घडल्याचा विचार दोघांच्याही मनात एकदमच आला.

‘गोखले साहेब, मी तिकडे येतोय दहा मिनिटात. तुम्ही कॉर्नरवर येऊन थांबा’ असे म्हणत अल्ताफने फोन बंद केला. नवव्या मिनिटालाच अल्ताफची मारुती आल्टो चौकात उभ्या असलेल्या गोखल्यांच्या समोर येऊन उभी राहिली. दोघेही घाईनेच निघाले. मागे कधीतरी श्रीकांतच्या बोलण्यात ‘कोकण- किनारा’ हॉटेलचे मालक काणे मामांबद्दल उल्लेख आला होता. नरवीर तानाजी चौकात आल्यावर गाडी थांबवून ते मुद्दाम हॉटेलमध्ये गेले. हॉटेलचे मालक काणे मामा काउंटरवर बसलेले होतेच. काणेमामांना पण श्रीकांतबद्दल काही माहित नव्हते. जातायेता तो बऱ्याचदा त्यांना दिसायचा पण गेल्या तीन दिवसात काही दिसला नव्हता. त्यांनाही काहीतरी अभद्र शंका आली. त्यांनी मुलाला काउंटरवर बसायला सांगितले आणि तिघेही अल्ताफ़च्याच गाडीतून ‘अनुग्रह’ बंगल्याजवळ आले. बंगला एकदम शांत होता. कुठेही काहीही आवाज येत नव्हते. गेट उघडून ते आत आले. श्रीकांतची सँट्रो जागेवर उभी होती. पायऱ्या चढून जात अल्ताफने अगोदर बेल वाजवली, पण आत कुठे काहीच आवाज किंवा हालचाल दिसली नाही. मग त्याने दरवाजा ढकलून बघितला तो आतून बंद होता. त्यांनी बंगल्याला एक चक्कर मारून बघितली. मागचा दरवाजा आणि सर्व खिडक्या आतून बंद होत्या. पुन्हा व्हरांड्यात आल्यावर गोखलेंनी हॉलच्या खिडकीच्या काचेतून आत बघितले. अगोदर काहीच दिसले नाही पण त्यांनी बाजूने डोळ्याजवळ हात नेताच त्यांना आतमध्ये श्रीकांत पालथा पडलेला दिसला. गोखले घाबरून बाजूला झाले. त्याचे ते दचकणे अल्ताफ आणि काणे मामांच्या लक्षात आले. त्यांनाही काचेतून श्रीकांत फरशीवर पडलेला दिसला. पण मनात इतर काही शंका येण्याऐवजी काणे मामा म्हणाले ‘अहो साठे साहेब आजारी असतील बहुतेक. बघायला कोणी नाही म्हणून मूर्च्छा येऊन पडले असतील’. मग तिघांनीही दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न केला. अचानक अल्ताफला आठवले या बंगल्याची एक डुप्लिकेट चावी आपण बनवून घेतलेली होती. ती गाडीतच आहे. त्याने पटकन जाऊन चावी आणली आणि दरवाजा उघडला. ते आत जाताच त्यांना जो तीव्र वास जाणवला त्यावरून श्रीकांत जिवंत नाही हे त्यांना लगेच कळून चुकले. गोखले पुढे होणार तेवढ्यात अनुभवी काणे मामांनी त्यांना हाताला धरून मागे ओढले.

‘अल्ताफ, प्रकरण काहीतरी वेगळच दिसतंय. आपल्याला पोलिसांना बोलावले पाहिजे’ अल्ताफलाही ते पटले. बंगल्यात काही फोन नव्हता पण काणेमामांच्या हॉटेलमध्ये मात्र होता. दरवाजा आहे तसा बंद करून घेत तिघेही परत कोकण-किनारा ला आले. काणेमामा आणि अल्ताफ तसे मुरलेले होते पण अख्ख आयुष्य बँकेत क्लार्क म्हणून काढलेल्या गोखल्यांना मात्र हे सर्व नवीन होते. त्यांना हुडहुडी भरली होती. उगाच या फंदात पडलो असे त्यांना झाले होते.

हॉटेल व्यवसायामुळे काणेमामांचे पोलीस खात्याशीही चांगले संबंध होते. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करताच तिकडून इन्स्पेक्टर काझी आणि त्यांची टीम निघाली. भरतपूर तालुक्याचे गाव असले तरी छोटे होते. त्यामुळे तिथे फार गुन्हेगारी घडत नसे. त्यातूनही एका चांगल्या बँकेतील मॅनेजरचा संशयास्पद मृत्य म्हटल्यावर वेळ न दवडता इन्स्पेक्टर काझी आपल्या टीमसोबत काणेमामांच्या हॉटेल जवळ आले. त्यांची गाडी येताने पाहताच हे तिघे अल्ताफच्या गाडीत बसले आणि रस्ता दाखवत पुढे निघाले. गोखले खरेतर यायला तयार नव्हते, मी घरी जातो म्हणत होते. पण काणेमामांनी त्यांना समजावून सांगितले.

‘हे बघा गोखले साहेब, आम्ही दोघंही तसे लांबचे आहोत. साठे साहेब तुमचे शाखाधिकारी आहेत म्हंटल्यावर तुम्ही हजर राहणे गरजेचे आहे. अन दुसरं बघा, प्रेत पहिल्यांदा तुम्ही पाहिलेय’ इन्स्पेक्टरने विचारले अन तुम्ही हजर नसला तर त्यांना उगाच संशय यायचा’ ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली. धैर्य गोळा करत गोखले त्यांच्याबरोबर निघाले.

तो सगळा ताफा बंगल्याजवळ आला. अल्ताफने आपल्याजवळ असलेल्या डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला आणि लगेच आपल्याकडे ही डुप्लिकेट चावी कशी आली याचे स्पष्टीकरणही देऊन टाकले. हो, नंतर उगाच संशय नको. इन्स्पेक्टर काझी आत आले. त्यांनी काणेमामा, अल्ताफ आणि गोखल्यांना बाहेरच थांबायला सांगितले होते. प्रेताची अवस्था पाहताच श्रीकांतला मरून दोन-तीन दिवस झालेत हे अनुभवी काझींनी ओळखले. सोबत आलेल्या डॉक्टरांना बॉडी चेक करायला सांगून काझींनी बंगल्याची पाहणी केली. कुठेही काही झटपट झाल्याचे चिन्ह दिसत नव्हते. चोरीचेही लक्षण नव्हते. तसे संशयास्पद काही नसले तरीही इतके नीटनेटके आवरलेले घर, डायनिंग टेबलवर पडलेली जेवणाची भांडी, त्यातील आता खराब झालेले असले तरी एवढे पदार्थ बघून त्यांना या बंगल्यात श्रीकांत व्यतिरिक्त कोणी स्त्री सुद्धा राहतेय हे स्पष्ट्पणे जाणवले. पण इथे एकच बॉडी आहे, मग इथली स्त्री कुठे गेली.

एव्हाना डॉक्टरांनी प्रेताची प्राथमिक तपासणी संपवली होती. इन्स्पेक्टर काझी जवळ आल्याचे पाहून डॉक्टर उठून उभे राहत म्हणाले.

‘प्रथमदर्शनी तरी यांचा मृत्यू हृदय बंद पडल्याने झाला असे वाटतेय. पण त्यांच्या चेहऱ्यावर हार्ट अटॅक येताना ज्या वेदना जाणवतात त्या वेदनेची काहीही लक्षणे दिसत नाहीत. शिवाय एकंदरीत त्याची निरोगी शरीरयष्टी पाहता त्यांना हार्ट प्रॉब्लेम असेल असे वाटत नाही. पोस्टमार्टेम झाल्यानंतरच मी नक्की कारण सांगू शकेल.’ डॉक्टरांच्या या माहितीनंतर काझींनी बाकीच्या टीमला पुढचे सगळे सोपस्कार करून बॉडी पोस्टमार्टेमला पाठवायला सांगितली. एका कॉन्स्टेबलने वायरलेस वरून ऍम्ब्युलन्स बोलावून घेतली. इतर काही चोकशी करायची म्हटले तर आजूबाजूला अक्षरश: कोणीही नव्हते. मग काझींनी या तिघांकडेच चौकशी केली. तिघेही श्रीकांतच्या काळजीपोटीच इथे आलेत हे त्यांना माहित होते. अल्ताफने या बंगल्याबद्दलचा सगळा इतिहास त्यांना सांगून टाकला. काणेमामा आणि गोखल्यांनी त्याला दुजोरा दिला. काझीही कोकणातलेच होते त्यामुळे त्यांचाही भुताखेतांवर विश्वास होताच. या बंगल्याबद्दल तेही ऐकून होतेच. त्यामुळे त्यांनी या कथेवर विश्वास ठेवला. परंतु या बंगल्याबद्दल सर्व माहित असूनही अल्ताफने ही जागा श्रीकांतला भाड्याने मिळवून दिली याबद्दल अल्ताफची चांगलीच खरडपट्टी काढली. तिथले सर्व उरकून बंगल्याला सील करून सगळे परत फिरले. अल्ताफला खरोखरच फार अपराधी वाटत होते. अल्प ओळख असली तरी श्रीकांतविषयी आपुलकी वाटलेल्या काणेमामांना सुद्धा खूप वाईट वाटत होते. गोखले अजून भेदरलेलेलच होते. त्यांचा काही संबंध नसतानेही त्यांना या पोल्स चौकशीचे दडपण आले होते. नवखा कोणी इन्स्पेक्टर असता तर त्याला गोखलेंचा चेहरा बघून संशय वाटला असता. पण इन्स्पेक्टर काझी चांगले मुरलेले होते. सरळमार्गी मध्यमवर्गीय माणसं पोलिसांना उगाचच घाबरतात हे त्यान्ना माहित होते. त्यामुळे त्यांनी गोखलेंना फार न छेडत वरवर जुजबी चौकशी केली.

दुसऱ्या दिवशी श्रीकांतचे आईबाबा पुण्यावरून आले. लतिकाबाईंचा आकांत पाहून सर्वांचीच मने हेलावून गेली. निळकंठराव मात्र धुराने परिस्थितीला तोंड देत होते. एव्हाना काझींनी पोस्टमार्टेम रिपोर्ट मिळवला होता. डॉक्टरांनी ‘हृदय अचानक बंद पडून मृत्यू’ असंच निदान केलं होतं. पण हृदय बंद पडण्याचे कारण मात्र त्यांना नक्की सापडले नव्हते. निळकंठराव आणि लतिकाबाईंनीही अगदी स्पष्ट सांगितले होते कि श्रीकांतला हृदय विकारच काय पण इतर कुठलाही आजार नाही. श्रीकांतचे थोडेफार होते ते साहित्य घेऊन दुःखी मनाने ते पुण्याला निघाले. श्रीकांतची डेड बॉडी अँब्युलन्सने पुण्याला पाठवायची व्यवस्था इन्स्पेक्टर काझींनीच केली होती. अकस्मात गूढ मृत्यू असा फाईलवर शेरा मारून इन्स्पेक्टर काझींनी फाईल गाडीच्या सीटवर टाकली आणि ड्रायव्हरला पोलीस स्टेशनकडे निघण्याची खून केली. भरतपुरात आता त्या बंगल्याविषयी गूढ अजूनच वाढले होते. पूर्वीही लोक त्याविषयी काहीबाही ऐकून होते पण आता या घटनेने लोकांनी या बंगल्याचेच काय या भागाचेच नाव टाकले.

या घटनेनंतर बरोबर तेरा दिवस उलटले. त्या संध्याकाळी बंगल्यातील लाईट अचानक लागले. मोगऱ्याचा वास घरभर दरवळू लागला आणि दोन धूसर प्रतिमा तिथे अवतीर्ण झाल्या.हळूहळू त्या दोनीही आकृती गडद होत होत दृश्य रूपात आल्या. त्यातील एक प्रतिमा स्त्री ची होती अर्थात अनुची आणि दुसरी प्रतिमा पुरुषाची म्हणजेच श्रीकांतची होती. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघेही आवेगाने एकमेकांच्या कुशीत सामावून गेले. आता या बंगल्यातून त्यांना कुठलीही शक्ती बाहेर घालवू शकणार नव्हती. जिवंतपणी नाही पण मेल्यानंतर मात्र श्रीकांत आणि अनुचे मिलन झाले होते…

समाप्त!

(ता.क.: ही कथा पूर्णपणे काल्पनिक केवळ मनोरंजन याच हेतूने लिहिली आहे. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धाना खतपाणी घालण्याचा किंवा भूतप्रेताच्या अस्तित्वाबद्दल गैरसमज पसरवण्याचा हेतू नाही.).

Story ends.

1 Like